देवगड,दि.११ एप्रिल
येवो समृद्धी अंगणी
वाढो आनंदी जीवनी
तुम्हासाठी या शुभेच्छा नववर्षाच्या व शुभ दिनी…
गुढीपाडव्याच्या शुभेच्छा..अशा शब्दात
९ एप्रिल रोजी दिविजा वृद्धाश्रमात पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात पारंपारिक पोशाख घालून आजी आजोबांनी आणि दिविजा वृद्धाश्रमातील कर्मचाऱ्यांनी अगदी थाटामाटात नव-वर्षाचे( गुढीपाडव्याचे ) स्वागत केले. सनई चौघड्याच्या गजरात आजी-आजोबांनी दिविजा वृद्धाश्रमात आरोग्यदायी व भरभराटीची गुढी उभारली. आश्रमातील सौ संगीता चव्हाण आजीने गुढीची पूजा केली व गुढीपाडव्याची दिविजा वृद्धाश्रमात सुरुवात झाली. ढोल ताशाच्या गजरात आश्रमातील कर्मचाऱ्यांनी लेझीम नृत्य सादर केले तर आश्रमातील आजोबा कीर्तिराज बागवे व आबा चव्हाण यांनी गाण्यांचा ठेका धरला. अगदी पारंपारिक पद्धतीने या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सेक्रेटरी श्री संदेश शेट्ये यांनी केले होते. दीक्षित फाउंडेशन च्या वतीने दिविजा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना आमरस पुरीचे पंचपकवानाचे भोजन आयोजित केले गेले होते. दीक्षित फाउंडेशन व दिविजा वृद्धाश्रम यांच्या वतीने आजच्या या कार्यक्रमात आजी आजोबा आपल्या वयाचा व दुखणे विसरून उत्साहाने व आनंदाने नाचत गात होते काही आजी आजोबांनी तर अशी प्रतिक्रिया दिली की एवढ्या आनंदात व थाटामाटात आम्ही स्वतःच्या घरी ही असे सण साजरे केले नाही. आज आश्रम नसून म्हातारपणातील आमचे दुसरे घर आहे अशी काही आजी-आजोबांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तर सायंकाळी दीक्षित फाउंडेशन देवगड यांच्या वतीने आजी-आजोबांसाठी खास समई नृत्याचे आयोजन दिविजा वृद्धाश्रमात करण्यात आले. समई नृत्य पाहून आजी आजोबा इतके प्रसन्न झाले की त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू तेवले. पूर्ण आयुष्यात अशा प्रकारचे समई नृत्य आम्ही कधी पाहिले नाही अशी आजी आजोबांनी प्रतिक्रिया दिली. असा हा गुढीपाडव्याचा सण उत्साहाने व आनंदात दिविजा वृद्धाश्रमात साजरा करण्यात आला.
Home आपलं सिंधुदुर्ग दिविजा वृद्धाश्रम आणि दीक्षित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाढव्याच्या शुभेच्छा सोहळा संपन्न!