निलेश राणे मालवण कुडाळ विधानसभेचे उमेदवार निश्चित
मालवण,दि.१६ जानेवारी
सोशल मिडीयाचा वापर करून निलेश राणे हे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार असल्याच्या अफ़वा उठवल्या जात आहे. मात्र, खुद्द निलेश राणे यांनीच अनेकवेळा आपण लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे पक्षाकडे आणि कार्यकर्त्यांकडेही जाहीर केलेले आहे. विरोधक या अफ़वा उठवत असून भाजप मधील काही जणही स्वतःच्या लॉबिंग साठी या अफ़वा उठविण्याची शक्यता असून तसे असल्यास त्याची दखल पक्ष घेईल. कोणीही काहीही बोलले तरी निलेश राणे हे कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघातून भाजपाचे उमेदवार निश्चित आहेत, असे भाजपचे मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
भाजपा तालुका कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत चिंदरकर बोलत होते. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर, संदीप परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी सभापती सुधीर साळसकर, अजिंक्य पाताडे, माजी उपासभापती राजू परूळेकर, मालवण तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजन गावकर, आबा हडकर, विजय निकम, मोहन कुबल तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धोंडी चिंदरकर म्हणाले,
निलेश राणे हे मालवण-कुडाळ विधानसभा मतदार संघात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पक्षाच्या आदेशानुसार विधानसभा मतदार संघ प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. निलेश राणे यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून विकासकामांचा धडाका लावला आहे. सोबतच विरोध पक्षातील अनेकांचा भाजपामध्ये होत असलेल्या प्रवेशामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. यातूनच निलेश राणे हे लोकसभा लढविणार अशा अफ़वा उठविल्या जात आहेत. यामागे विरोधक असल्याचा आम्हाला संशय आहे. तसेच अशा अफ़वा पसरवून भाजप मधीलच काही जण चुकीच्या पद्धतीने लॉबिंग करून आपले घोडं पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतील तर पक्षाकडून याची गंभीर दखल घेतली जाणार आहे. विकासाच्या नावाखाली जनतेला भडकवण्याचे प्रकारही जनतेच्या दरबारात टिकणार नाहीत. विरोधकांच्या टिकेला आणि खोट्या प्रचाराला भाजपा कार्यकर्ते बळी पडणार नाहीतच, मात्र स्वकियांनीही यासाठी एकसंघपणे एकदिलाने आणि एकविचाराने काम करून महायुतीचा जो उमेदवार लोकसभेसाठी असेल तो आणि मालवण – कुडाळ विधानसभा मतदार संघासाठी निलेश राणे यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे, असेही श्री. चिंदरकर म्हणाले.
लोकसभा निवडणूकीत रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदार संघात भाजपचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची आग्रही भुमिका आहे. मात्र, यासाठी वरिष्ठ पातळीवर निर्णय होणार असून महायुतीच्या निर्णयानुसार लोकसभा निवडणुकीत उमेदवार मिळणार आहे. यामुळे पक्षाकडून जो उमेदवार दिला जाईल, त्याला विजयी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करणार आहेत, असेही धोंडी चिंदरकर यांनी स्पष्ट केले.
धोंडी चिंदरकर यांनी आ. वैभव नाईक यांच्यावरही टीका करत आम. नाईक यांचे शिवसेना शिंदे गटात जाण्याचे सर्व दरवाजे बंद झाल्याने आता त्यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असे सांगितले. आम. नाईक यांना आपला पराभव दिसू लागल्याने ते सैरभैर झाले आहेत. भाजपाने केलेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यासाठी पळापळ करत आहेत. आम. नाईक जे काही पक्षप्रवेश घेत आहेत, ते तकलादू आहेत. विधानसभा निवडणुकीत मतदारच नाईक यांना त्यांची जागा दाखवून देतील, असेही श्री. चिंदरकर म्हणाले.
यावेळी विजय केनवडेकर म्हणाले, निलेश राणे यांनी मालवण कुडाळ विधानसभा प्रमुख पदावर कार्यरत झाल्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये शतप्रतिशत भाजपासाठी प्रयत्न करत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सत्ताधारी बनविले आहे. अनेक ग्रामपंचायत, खरेदी विक्री संघ, सोसायटी यामध्ये आता भाजपची सत्ता आलेली आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करताना सर्व बुथ निर्माण करत कार्यकर्त्यांना बळ दिलेले आहे. पदवीधर मतदार नोंदणी, भाजप संघटना वाढ, सोशल मीडिया वॉर यासह भाजपकडून देण्यात आलेल्या प्रत्येक कार्यक्रमात निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण कुडाळ मतदार संघ एक नंबर राहिला आहे. यामुळे विरोधकांकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असेही केनवडेकर म्हणाले.