फोंडाघाट,हवेलीनगर येथील ट्रक व डंपरचे टायर चोरीला..

१ लाख ३२ हजार रुपये किमतीची चोरी ;अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल

कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)

फोंडाघाट,हवेलीनगर येथील मोहम्मद हैदर केयामुद्दीन अली यांच्या टायर पंक्चर काढण्याच्या दुकानाजवळ ठेवलेले १लाख ३२ हजार रुपये किमतीचे ट्रक व डंपरचे नवीन सात टायर,ट्यूब,फ्लॅप असे साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केले आहे.ही घटना १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास उघड झाली.

मोहम्मद हैदर केयामुद्दीन अली यांच्याकडे विजय लक्ष्मण काथरूड यांनी डंपरचे तर प्रदीप प्रकाश गोरुले व बाळकृष्ण शिंदे यांनी ट्रकचे टायर,ट्यूब,फ्लॅप बदलण्यासाठी ८ व १० जानेवारी रोजी दिले होते. मोहम्मद अली यांनी आपल्या दुकानाच्या पाठीमागे त्या टायरसह इतर साहित्य ठेवले होते.सोमवारी रात्री ते टायर ठेवलेल्या ठिकाणी होते.मात्र, मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास अली हे आपले दुकान उघडण्यासाठी आले असता टायरसह ठेवलेले साहित्य गायब झाले होते.शोधाशोध करूनही त्यांना आजूबाजूच्या परिसरात ते साहित्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी ट्रक मालकांना टायरसह इतर साहित्य गायब झाल्याची माहिती दिली. त्यानंतर ट्रक मालक आल्यावर मोहम्मद हैदर केयामुद्दीन अली यांनी चोरीबाबतची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेचा अधिक तपास पोलिस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बापू खरात करीत आहेत.
दरम्यान, फोंडाघाट पोलिस तपासणी नाक्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका डंपर मधून टायर कोणी तरी नेत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे पोलिस त्यादृष्टीने चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.