सावंतवाडी विधानसभेतील कुणाच्यातरी हट्टामुळे २ सभा रद्द…

सावंतवाडी दि.१३ एप्रिल
सावंतवाडी व वेंगुर्ले येथील भाजपा व शिवसेना महायुतीच्या सभा आणि सावंतवाडी येथील निवडणूक कार्यालय उद्घाटन विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यामुळे रद्द झाल्याने भाजपचे मतदारांचे समन्वयक माजी आमदार राजन तेली यांनी स्टेटस ठेवून मनातील खदखद व्यक्त केली आहे.
भाजप आणि शिवसेना महायुतीचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार निश्चित झाला नसल्याने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या सभांना ब्रेक लागला आहे.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना डावलून भाजपने वेंगुर्ले व सावंतवाडी तालुक्यात सभांचे आयोजन केले होते तसेच भाजपच्या सावंतवाडी निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आज माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्याचे निश्चित केले होते.
सावंतवाडी व वेंगुर्ले तालुका सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात येत असून भाजप आणि शिवसेना महायुती करून निवडणूक लढत आहेत तसेच महायुतीचा उमेदवारही जाहीर झाला नाही त्यामुळे केसरकर यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे माझ्या मतदारसंघात होणाऱ्या कार्यक्रमांत मला सहभागी व्हायचे आहे, असे सांगितले त्यामुळे सभा व प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रद्द करण्यात आले. केसरकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. मात्र त्याबाबत वेळ व तारीख जाहीर करण्यात आली नाही.
वेंगुर्ले तालुक्यात होऊ घातलेल्या लोकसभा
निवडणूक २०२४ च्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील पाचही जिल्हा परिषद मतदारसंघाती “कार्यकर्ता संवाद मेळावा” अचानक आज शनिवारी सकाळीच रद्द करण्यात आला. आज १३ एप्रिल रोजी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सावंतवाडी मतदारसंघ निवडणूक प्रमुख राजन तेली यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार होते.
दरम्यान सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे समन्वयक, माजी आमदार राजन तेली यांनी आज स्टेटस ठेवून याबाबत नाराजी व्यक्त केली. या स्टेटस मध्ये त्यांनी म्हटले आहे, सावंतवाडी विधानसभेतील भारतीय जनता पार्टीच्या नियोजित सभा कोणाच्यातरी हट्टामुळे दोन वेळा रद्द झाल्या कार्यकर्त्यांनी अतिशय मेहनत करून सभेचे नियोजन केले होते माझ्या सर्व कार्यकर्त्यांना झालेल्या त्रासाबद्दल मी मनापासून माफी मागतो.
या स्टेटसमुळे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर व राजन तेली यांच्यातील राजकीय वाद पुन्हा उफाळून आल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार आणि भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी याबाबत बोलण्याचे टाळले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हेंच उमेदवार समजून भाजप प्रचारात उतरले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा महायुतीचा उमेदवार लवकरच जाहीर होणार आहे. महायुतीतील प्रत्येक पक्ष उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न करत आहे. एकदा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीचे सर्वच जण प्रचारात आघाडी घेतली.