मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ग्रंथपाल ग्रंथालय गौरव सोहळा’

आचरा,दि.१७ जानेवारी(अर्जुन बापर्डेकर)
“ग्रंथालये ही सांस्कृतिक विद्यापीठे आहेत, तर ग्रंथपाल हे ग्रंथ आणि वाचक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्यामुळेच दर्जेदार ग्रंथ चोखंदळ वाचकांच्या हाती जातात,” असे उद्गार सुरेश ठाकूर, अध्यक्ष कोमसाप मालवण यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथपाल ग्रंथालय गौरव’ सोहळ्यात काढले. दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नगर वाचनालय मालवणच्या सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मा रुजारिओ पिंटो, (केंद्रीय सदस्य कोमसाप) हे होते तर प्रमुख मान्यवरात सदानंद कांबळी, डॉ. सुभाष दिघे, प्रविण पारकर आदी व्यासपीठावर होते. याचवेळी मालवण तालुक्यातील वीस ग्रंथालयांना कोकण मराठी साहित्य परिषद मालवणने संपादित केलेली बीज अंकुरे अंकुरे (ललित) आणि ये ग ये ग सरी (कविता संग्रह) ही प्रत्येकी दोन पुस्तके सर्व वाचनालयांना देण्याचा शुभारंभ करण्यात आला. मा. किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत, (शिवसेना नेते रत्नागिरी सिंधुदुर्ग) यांच्या देणगीतून वरील दोन्ही पुस्तके सिंधुदुर्गातील सर्व वाचनमंदिरांना देण्यात येणार आहेत. त्यांच्या वाढदिवसाची त्यांनी ही अक्षरभेट दिली आहे.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून सर्व ग्रंथपालांच्या वतीने संजय शिंदे ग्रंथपाल नगरवाचनालय मालवण यांचा रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर ग्रंथपाल लेखिका म्हणून श्रीम. ऋतुजा केळकर, ग्रंथपाल साने गुरुजी वाचन मंदिर मालवण यांचा सुभाष दिघे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. सर्व ग्रंथपालांच्या वतीने ग्रंथ देणगीदार मा. किरण उर्फ भैय्यासाहेब सामंत (रत्नागिरी) यांचे तसेच त्यासाठी आग्रही प्रयत्न करणारे त्यांचे स्नेही महेशराव राणे (आचरे) यांचे ऋतुजा केळकर यांनी आभार व्यक्त केले. संजय शिंदे, (ग्रंथपाल नगरवाचन मंदिर मालवण) म्हणाले, “ग्रंथसंवर्धन पंधरवडा कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या सहकार्याने अवर्णनीय असा साजरा झाला. सर्व ग्रंथपालांचा सत्कार असा आज प्रथमच होत आहे.” त्याबद्दल त्यांनी कोमसाप मालवणचे आभार मानले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना ज्येष्ठ मालवणी कवी रुजारियो पिंटो म्हणाले, “वाचन संवर्धन पंधरवड्याचे निमित्त साधून हा जो आगळा सोहळा साजरा होत आहे, तो सर्वांनाच वाचनाची ओढ लावणार आहे. यावेळी रुजारीओ पिंटो यांच्या मालवणी हास्य कवितांचा कार्यक्रम साजरा झाला. त्यांच्या शालग्या, सपान, बाबुराव या कविता रसिकांना खदखदून हसवून गेल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ऋतुजा केळकर यांनी केले.