वेंगुर्ल्यात ‘समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग‘ संस्थेची स्थापना

वेंगुर्ला,दि.१६ एप्रिल

निस्सिम, निरंतर व निःस्वार्थी सेवेचे व्रत अंगिकारून सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने वेंगुर्ल्यात ‘समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग‘ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. नुकताच संस्थेचा शुभारंभ करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षपदी सुहास कोळसुलकर यांची निवड करण्यात आली आहे. ही संस्था सहाय्यक धर्मादाय आयुक्त सिंधुदुर्ग यांच्या न्यासमध्ये नोंदणीकृतही केली आहे.

तळागळातील वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी लढा उभारणे, ग्रामीण भागात आरोग्य सुविधा निर्माण करणे, जिल्ह्यातील मुलांना दर्जेदार कौशल्याधारित शिक्षण उपलब्ध करून देणे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालविणे, निराधार वृद्धांच्या सेवेसाठी कार्य करणे, विविध सामाजिक उपक्रमातून वंचित घटकांना सहाय्य करणे आदी महत्वाची धेय्ये बाळगून ही संस्था कार्यरत राहणार आहे.

यावेळी निवडण्यात आलेली कार्यकारिणी पुढीलप्रमाणे आहे. कार्याध्यक्ष-योगेश कुबल, महिलाध्यक्ष आकांक्षा केळकर, उपाध्यक्ष सलील नाबर व विश्वनाथ कांबळी, सचिव महेंद्र मातोंडकर, सहसचिव सुहास खोबरेकर, खजिनदार जगदीश सापळे, सहखजिनदार समीर घाटे, सांस्कृतिक प्रमुख संजिवनी गावडे, क्रीडा प्रमुख- मिलिद गावडे, समन्वयक वसंत पेडणेकर, संघटक-शैलेश भोसले तर सदस्यपदी महेश वाडकर व अमोल नाईक यांची निवड करण्यात आली आहे.