मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडकमधील कामांबाबत आ. वैभव नाईक यांनी घेतली सचिवांची भेट

कामे तात्काळ सुरु करण्याबाबत दिले निवदेन

कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)

वर्कऑर्डर न दिल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुख्यमंत्री व पंतप्रधान ग्रामसडक योजनेतील रखडलेली कामे तात्काळ सुरु करण्याबाबत काल मंगळवारी आमदार वैभव नाईक यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव के. टी. पाटील यांची भेट घेतली व त्यासंबंधीच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी कामांच्या सद्यस्थितीची माहिती त्यांनी करून दिली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना (सीएमजीएसवाय) व पंतप्रधान ग्रामसडक योजना (पीएमजीएसवाय) या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील ११० रस्त्यांची कामे प्रस्तावित असून यासाठी ३१८ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. कुडाळ मालवण मतदार संघातील ३५ रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे. या कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही वर्कऑर्डर देण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे हि कामे रखडली आहेत. सदरचे रस्ते खड्डेमय झाले असून नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तरी तात्काळ सदर कामांना वर्कऑर्डर देण्यात याव्यात. व कामे पूर्ण करण्यात यावीत अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे सचिव के. टी. पाटील यांच्याकडे केली आहे.