मोर्ले गावात धुमाकूळ घालत असलेल्या हत्तींनी आपला मोर्चा पाळये सोनावल गावात

दोडामार्ग, दि.१७ जानेवारी

मोर्ले गावात धुमाकूळ घालत असलेल्या हत्तींनी आपला मोर्चा सोमवारी रात्री पाळये सोनावल गावात वळवून येथील शेतकर्‍यांच्या उन्हाळी हंगामातील वायंगण शेती, नारळ, सुपारी, केळी यांचे अतोनात नुकसान केले. यामुळे शेतकरी बांधव हैराण झाले आहेत. जंगली हत्ती कळपाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून तिलारी खोर्‍यातील हेवाळे, घाटीवडे, बांबर्डे, पाळये, केर, मोर्ले, घोटगेवाडी या ठिकाणी टस्कर हत्ती तसेच अन्य पाच हत्ती कळप अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेती बागायती उन्हाळी शेती करणे कठीण झाले आहे. आता काजू हंगाम सुरू होत आहे. अशा प्रकारे जंगली हत्ती दिवसाढवळ्या फिरत आहेत. त्यामुळे काजू बागायती मध्ये जाणे धोकादायक बनले आहे. सोनावल गावात मंगळवारी सायंकाळी सहा वाजता हत्ती पिल्लू गावातील सातेरी मंदीर नजीक शेतीमध्ये प्रवेश करण्यासाठी दाखल झाले. यामुळे एकच खळबळ उडाली.