नगरपरिषदेने आंबा विक्रेत्यांवर कारवाई करू नये तर सन्मानाने जागा द्यावी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

सावंतवाडी दि.१८ एप्रिल 
सध्या आंब्याचा हंगाम आहे. सावंतवाडी शहरात विक्रीसाठी आंबा बागायतदार, विक्रेते येतात. त्यांना आंबे विक्रीसाठी सन्मानाने जागा मिळाली पाहिजे. नगरपरिषद मुख्याधिकारी सागर साळुंखे यांनी आंबा विक्रेत्यांवर कारवाई करू नये अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे.

कोकणातील हापूस आंबा हे प्रमुख पीक मानलं जातं. सध्या वाढत असलेल्या अतिउष्णतेमुळे आंबा लवकर पिकत आहे. सावंतवाडी शहरातील मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात आंबा येत आहे. त्यांची बसण्याची व्यवस्था काही ठिकाणी झाली आहे. परंतु आंबा विक्रेते स्टँडच्या समोरील फुटपाथवर बसलेले आहेत त्यांना बसण्यापासून मज्जाव करण्यात येऊ नये. जिथे जागा मिळेल तिथे आंबे विक्रेत्यांना स्थान द्या. आंबा विक्रेत्यांवरती कारवाई करण्यात येऊ नये असे आवाहन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी नगरपरिषदेला केले आहे.