तमाशा आणि वारी या विषयावर संवाद व स्लाईड शो येत्या १९ जानेवारी रोजी

सावंतवाडी,दि.१७ जानेवारी
तमाशा आणि वारी या विषयावर संवाद व स्लाईड शो येत्या दि.१९ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर मध्ये तर दि.२० जानेवारी रोजी रात्री कणकवली मध्ये होणार आहे.
श्रीराम वाचन मंदिर कार्याध्यक्ष अँड संदीप निंबाळकर यांनी ही माहिती दिली.

तमाशा आणि वारी या महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या लोकपरंपरा आपल्या संवेदनशील नजरेने कॅमेऱ्यात टिपणारे श्री संदेश भंडारे हे नाव आता अपरिचित राहिलेले नाही.
आत्मभान ट्रस्टचे अध्यक्ष असलेले भंडारे यांनी शब्दरूप विठ्ठल या अनोख्या शिल्पमांडणीची कल्पना मांडून ती अनेक समविचारी मित्रमंडळींच्या आणि चिंचणी गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने २ जुलै २०२२ रोजी प्रत्यक्षात आणली.
प्रसिद्ध पंढरपूर वारीच्या मार्गातील चिंचणी गावातील हा शब्दरूप विठ्ठल हा आता अनेकांच्या प्रेमाचा विषय झाला आहे.
स्व-प्रेरणेने धर्म, जात,आर्थिक, सामजिक भेदाभेद अमंगळ मानत काही शतके सुरू असलेली वारी हा समाजशास्त्राचा आता संशोधन विषय बनला आहे. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे बीज या वारीत आहे. भक्तिभावाइतके महत्त्वाचे असलेले पुरोगामित्व आता पुन्हा एकदा जागृत होणे गरजेचे असल्याची तीव्र निकड श्री भंडारे आणि मित्रपरिवाराला वाटते आहे.
तमाशा ही परंपरागत लोककला ही मनोरंजनाबरोबर सोंगड्याच्या बतावणीतून समाज प्रबोधनाचे काम करणारी लोककला आहे. राजाचे काय चुकते आहे हे विनोदाच्या माध्यमांतून परखडपणे सांगणे हे या लोककलेचे शक्तिस्थान आहे.
श्री संदेश भंडारे यांच्या रत्नागिरी, सावंतवाडी आणि कणकवलीतील कार्यक्रमांचे त्या त्या ठिकाणच्या स्थानिक संस्था आणि मित्रांच्या मदतीने आम्ही करत असलेले आयोजन हा तमाशा आणि वारी यांच्या पुनर्ओळखीचा एक प्रयत्न आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री संदेश भंडारे यांच्या आत्मभान ट्रस्टच्या कामाविषयी त्यांच्याकडून जाणून घेता येईल.
कार्यक्रम विनामूल्य आहेत पण श्री भंडारे यांच्याशी होणाऱ्या संवादातून या कामाचे महत्त्व आपल्याला पटले तर आपणही त्यात सक्रिय व आर्थिक सहभाग द्यावा, असे आवाहन अँड संदीप निंबाळकर,वंदना करंबेळकर, प्रसाद घाणेकर यांनी केले आहे.

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे कला संकुल, येथे शनिवार,दि .२० जानेवारी, रात्री ९ वाजता हा कार्यक्रम सादर होणार आहे असे त्यांनी सांगितले.