मोदी दौ-यात केलेल्या कामांमध्ये गोलमाल ; वरवडे येथील पुल उभारणीत भरावासाठी नदीतले गोटे टिकणार काय ?
कणकवली,दि.१७ जानेवारी ( भगवान लोके )
रोजकोट किल्ला उभारणी , हॅलिपॅडची कामे , रस्ते , रेल्वे स्टेशन सुशोभिकरण व अन्य कामांसाठी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड हे आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम देतात. आम्ही मागवलेल्या माहीतीच्या अधिकारातील माहिती मध्ये चुकीचा खुलासा देण्यात आलेला आहे. मोदी दौ-यात केलेल्या कामांमध्ये सगळा सावळा गोंधळ असुन त्यांची कारभाराची कसुन चौकशी व्हावी. अशी मागणी सचिवांकडे करण्यात येईल. अन्यथा फेब्रुवारीत आंदोलन छेडण्यात येणार आहे. सर्वगोड यांनी लक्षात ठेवावं हा जिल्हा चिकित्सकांचा असून अडीच वर्षात चौकशा काय असतात ? हे दाखवून देवू अशा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिला.
दरम्यान , तत्पूर्वी कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांच्या दालनात माजी आमदार व सामाजिक कार्यकर्त्यांनी वरवडे पुलाचे बांधकाम व इतर कामांबाबत भेट घेतली . त्यावेळी परशुराम उपरकर आणि श्री. सर्वगोड यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली.
कणकवली येथील कार्यकारी अभियंता श्री. सर्वगोड यांच्या भेटीनंतर श्री. उपरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला . यावेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद सांडव , संदीप लाड , अमित इब्रामपुरकर , सचिन गावडे , विलसन गिरकर , दुलाजी चौकेकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा झाला. त्यावेळी केलेल्या कामाचे चिरे व फरश्या निघाल्या होत्या याबाबत निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आम्ही त्यासर्वच कामांची अंदाजपत्रके व माहीती मागवली असता. चुकीच्या पध्दतीने माहिती देण्यात आली. ज्या अधिकारी माहिती देण्याची गरज होती ती दुस-याच अधिका-याने माहीती दिली. विविध हॅलिपॅडसाठी 2 फुट उंची दाखवली . मात्र प्रत्यक्षात 150 एमएम उंची आहे. 2 कोटी रुपये खर्च केलेल्या हॅलिपॅड मधील 2 हॅलिपॅड उकरुन टाकण्यात आलेली आहेत. या सर्व कामांमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप परशुराम उपरकर यांनी केला. वरवडे सेंट उर्सुला स्कुल नजिक 8 कोटी रुपये खर्च करुन पुल बांधल जात आहे. या ठिकाणी नदीतलाच गाळ गोटे काढून भराव केला जात आहे. प्रत्येक दिड फुटावर माती भराव आणि पाणी मारुन रोलींग आवश्यक असताना थुकपट्टी लावली जात आहे. रेल्वे सुशोभीकरण व जोडरस्ते या कामांमध्ये सुध्दा घोळ सुरु आहे. भराडी देवी मंदिराकडे 22 कोटीची कामे करण्यात आली . त्याबाबतही काही चुकीची प्रक्रिया राबवण्यात आली आहे. सर्वगोड हे आठवड्यातील 3 दिवस मंत्रालयात बसुन काय करतात . स्वत:च्या स्वार्थासाठी ते काम करत आहेत. माहितीच्या अधिकारात माहिती मागणे हा आमचा अधिकार आहे. येत्या काळात तपास यंत्रणा काय आहेत ? हे श्री. सर्वगोड यांना दाखवून देवू असे आपले चॅलेंज असल्याचे खुले आव्हान असल्याचा इशारा परशुराम उपरकर यांनी दिला .