आश्वासनांच्या गाजरांना कंटाळून कुणकेरी -सरुंदेवाडी वासियांची सर्वपक्षियांना प्रचार बंदी.

सावंतवाडी दि.२१ एप्रिल
कुणकेरी सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेले गाव पण या गावामधील सरुंदेवाडी आजही रस्त्याला पुलाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे या परिसरात सर्वपक्षीय नेत्यांना प्रचारास बंदी चे फलक झळकले आहेत.
या वाडीवर जाण्यासाठी च्या मार्गात मोठा ओहोळ असल्याने या वाडीचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. मागील वीस वर्षांपासून वेळोवेळी या वाडीवरील रहिवाश्यांनी सर्वपक्षिय मंत्री, आमदार, खासदार यांना निवेदने तसेच सकडे घातली. मात्र निवडणुकीपुरती खोटी आश्वासाने देऊन तोंडाला पाने पुसण्या पलीकडे काहीही केले नाही.

या सर्व राजकीय आश्वासाने व भूलथापांना कंटाळून येणाऱ्या लोकसभा व त्यानंतरच्या सर्वच निवडणुकांना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना, पुढऱ्यांना तसेंच कार्यकर्त्यांना वाडीमध्ये प्रचारासाठी येण्यास प्रवेश बंदी केली आहे. तसा फलक देखील वाडीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आला आहे. असा फलक लागणे म्हणजे तथाकथित बड्या पुढाऱ्यांना सणसणीत चपराकच म्हणावी लागेल. अशी चर्चा सर्वसामान्यातून होत आहे.