शेणई बालवाडीचा स्नेहमेळावा व बक्षिस वितरण समारंभ उत्साहात

वेंगुर्ला,दि.२३ एप्रिल

वेंगुर्ला येथील शेणई बालवाडीचा स्नेहमेळावा व बक्षिस वितरण समारंभ येथील साई मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाले. बालवाडीच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांमुळे कार्यक्रमात आणखीनच रंगत आली.
शेणई बालवाडीच्या वार्षिक स्नेहमेळाव्याचे उद्घाटन दीपप्रज्पलाने सामाजिक कार्यकर्ते हर्षद डेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेश्मा मालवणकर, अर्चना नार्वेकर, महेश गावडे, माधवी मयेकर, समिधा धुरी, मयुरी माडकर, सारस्वत बँक मॅनेजर सतिश बागवे, वेंगुर्ला नं.१चे मुख्यध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर, बालवाडीच्या शिक्षिका रिशा सावळ आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर बालवाडीच्या चिमुकल्यांनी ‘फुलपाखरू छान किती दिसते…‘, छोट्या छोट्या हनुमान बनलेल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला ‘सेतू बांधा रे बांधा रे…‘, ‘देवी आईचा गोंधळ‘ अशी एकापेक्षा एक सरस नृत्य सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. देशभक्तीपर नृत्य करून या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
दरम्यान यावेळी सध्या इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेली या बालवाडीची विद्यार्थिनी निरजा माडकर हिचा कथ्थकमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल तिचा शेणई बालवाडीतर्फे शाल, श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान केला. तसेच या बालवाडीच्या शिक्षिका रिशा सावळ यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल पालक सुनिल नाईक व नाईक परिवाराकडून सन्मानपत्र, श्रीफळ, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी बालवाडीच्या शिक्षिका रुपाली हरमलकर आणि सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल यांनी मुलांसाठी पुस्तके व रंग वाटप केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार नंदकिशोर आचार्य यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितेश कुडतरकर, नाईक मॅडम, सुनिल नाईक यांच्यासह पालकांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे शेणई बालवाडीचा हा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला.