वसंत देसाई मुक्तावकाशही रसिकांच्या सेवेत
केदार सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती
कुडाळ,दि. २४ एप्रिल
सुप्रसिद्ध रंगभूषाकार कै. बाबा वर्दम यांच्या प्रमाणेच कुडाळ शहराचा सांस्कृतिक वारसा समृद्ध करणाऱ्या साहित्यक कै. चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू आणि प्रसिद्ध संगीतकार कै. वसंत देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे कायम स्मरण होत राहण्यासाठी क.म.शि.प्र. मंडळाच्या वतीन चिं. त्र्यं. खानोलकर ललित कला केंद्र आणि वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच उभारण्यात आला आहे. या वस्तूचा उदघाटन सोहळा शुक्रवार, २६ एप्रिल या आरती प्रभू यांच्या स्मृतिदिनी होत आहे. सुप्रसिद्ध नाट्यकारर शफाअत खान हे उदघाटक असून कमशिप्र मंडळाचे अध्यक्ष ऍड. हनुमंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. कमशिप्र मंडळाचे सदस्य केदार सामंत यांनी बुधवारी कुडाळ येथे पत्रकार परिषदेत याविषयी अधिक माहिती दिली.
यावेळी बोलताना केदार सामंत यांनी सांगितले की, कुडाळ शहराचा सांस्कृतिक वारसा फार समृद्ध आहे. रंगभूषा महर्षी कै. बाबा वर्दम, सुप्रसिध्द संगीतकार कै. वसंत देसाई, सुप्रसिध्द नाटककार कवी चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू यांनी सांस्कृतिक क्षेत्रात कुडाळचे नाव प्रसिद्ध केले आहे. हे तिघेही क.म.शि.प्र. मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल, कुडाळ या प्रशालेचे माजी विद्यार्थी. या तिन्ही माजी विद्यार्थ्यांच्या स्मृती कुडाळकर रसिकांच्या मनात चिरंतन राहाव्यात, नवीन पिढीला सतत यांची माहिती व्हावी म्हणून क.म.शि.प्र. मंडळाने या तिघांचेही यथोचित स्मारक उभारण्याचे ठरवले. पैकी सुप्रसिध्द रंगभूषाकार रंगभूषा
महर्षी कै. बाबा वर्दम यांचा नावे प्रशस्त रंगमंच उभारुन सुसज्ज नाट्यगृह कुडाळकर रसिकांच्या सेवेसाठी तयार आहेच. त्याच बरोबरीने सुप्रसिध्द नाटककार कवी कै. चिं. त्र्यं. खानोलकर उर्फ आरती प्रभू आणि सुप्रसिध्द संगीतकार कै. वसंत देसाई यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचे कायम स्मरण होत रहाण्यासाठी मंडळातर्फे चिं. त्र्यं. खानोलकर ललित कला केंद्र व वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच बांधण्यात आले आहे.
वसंत देसाई आणि चिंत्र्यं यांचे यथोचित स्मारक व्हावे है मंडळाचे माजी अध्यक्ष कै, एकनाथ ठाकूर यांचे स्वप्न होते. त्यांच्याच हस्ते १९९९ मध्ये या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते. परंतु, इतर शैक्षणिक जबाबदाऱ्यांमुळे या प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम सुरु व्हायला २०१६ साल उजाडले. ८ मार्च २०१६ रोजी चिंत्र्यं यांच्या जन्म दिनी सुप्रसिध्द साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते या इमारतीचा कोनशिला समारंभ पार पडला. येत्या शुक्रवारी २६ एप्रिल २०२४ रोजी संध्याकाळी ठिक ४.०० वाजता चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या स्मृतीदिनी या इमारतीचे उद्घाटन सुप्रसिध्द नाटककार शफाअत खान यांच्या हस्ते. क.म.शि.प्र. मंडळाचे अध्यक्ष अॅड. हनुमंत सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आणि चिंत्र्यंच्या कन्या दिप्ती कळसुलकर, हेमांगी नेरकर चिंत्र्यंचे जावई अरविंद नेरकर, चिंत्र्यंचे चिरंजीव निवृत्ती खानोलकर, क.म.शि.प्र. मंडळाचे माजी अध्यक्ष इंद्रजित सावंत, कुडाळमधील ज्येष्ठ नाट्य कलावंत तुकाराम उर्फ भाऊ शिरसाट, सुप्रसिध्द
रंगभूषाकार विलासदादा कुडाळकर, ज्येष्ठ चित्रकार विजय पडते. कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष किशोर काणेकर सुप्रसिध्द दिग्दर्शक चंदु शिरसाट, बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या ललित कला केंद्रात नृत्य, नाट्य संगीत तसेच चित्रकला शिल्पकला यासारख्या ललित कलांच्या शिक्षणाची सोय होणार आहे. या कला केंद्रात चित्र्यं यांचे सर्व साहित्य असणारे “आरती प्रभू, कला अकादमी” नावाने स्वतंत्र दालन असणार आहे. नाटक, एकांकिका, विविध कार्यक्रमांच्या तालर्मीसाठी एक मोठा तालीम हॉल आहे. या तालीम हॉलला कुडाळ मधील सुप्रसिद्ध अभिनेते कै. श्री. प्रकाश पाटणकर यांचे नाव देण्यात आले आहे. स्वतंत्र रंगभूषा कक्ष असून त्याला कुडाळ मधील सुप्रसिद्ध रंगभूषाकार कै. शंकरभाई वर्दम यांचे नाव देण्यात आले आहे. गायन वादन यासाठी संगीत कक्ष असुन या कक्षाला सुप्रसिध्द संगीत गुरु कै. श्रीपाद बुवा माडये यांचे नाव देण्यात आले आहे.
कुडाळमधील व परिसरातील कलाकारांना आपल्या कलांचे प्रदर्शन करता यावे यासाठी मोठे कला दालन उपलब्ध असून या कला दालनाला कुडाळ हायस्कूलचे माजी कला शिक्षक, कला दिग्दर्शक कै. शंकर गजानन सावंत उर्फ एस. दाजी यांचे नाव देण्यात आले आहे. सुप्रसिध्द संगीतकार कै. वसंत देसाई यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावे प्रशस्त असा वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच उभारण्यात
आला आहे. ही संपूर्ण वास्तू कुडाळच्या सौंदर्यात भर टाकणारी असुन, कुडाळचा सांस्कृतिक वारसा अधिक समृद्ध करणारी ठरेल असे कार्य तिथे घडत राहील याची खात्री आहे. या उद्घाटन समारंभानंतर लगेचच वसंत देसाई मुक्तावकाश रंगमंच येथे दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा शेषात्मज गणेश हा पौराणिक नाट्य प्रयोग सादर होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्वानी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे, असे केदार सामंत यांनी सांगितले.