मंत्री दीपक केसरकर यांनी आणलेली बहुचर्चित व्हॅनिटी व्हॅन प्रचारात उतरली

सावंतवाडी, दि.२५ एप्रिल
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आणलेली बहुचर्चित व्हॅनिटी व्हॅन प्रचारात उतरली. आज तीचा शुभारंभ करण्यात आला.

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दीपक केसरकर यांनी प्रचारासाठी आणलेल्या “व्हॅनिटी व्हॅन”चा शुभारंभ आज करण्यात आला. प्रचारा दरम्यान रात्री मतदार संघात थांबता यावे यासाठी या व्हॅनचा वापर श्री. केसरकर करणार आहेत. आज त्यांनी आपल्या प्रचाराला सुरूवात केली. मळेवाड येथे होणाऱ्या सभेला या गाडीने कार्यकर्त्यांसह मार्गस्थ झाले.

यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अशोक दळवी, महिला जिल्हाध्यक्ष निता कविटकर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गुणाजी गावडे, सुरज परब, संजय माजगावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. केसरकर यांनी व्हॅनिटी व्हॅन प्रचाराला आणल्यानंतर त्यांना विरोधकांकडून घेरण्याचा प्रयत्न करण्यात होत आहे. मतदार उन्हात आणि केसरकर एसीत असे आरोप केले जात आहेत. तरीही मतदार संघात प्रचारा दरम्यान राहण्यासाठी आपण या गाडीचा वापर करणार आहे, असे केसरकर यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी आज पासून व्हॅनिटी घेवून प्रचाराला सुरूवात केली आहे.