नर्सरी निर्मितीच्या मालक सौ. सायली गोवेकर यांनी वाण म्हणून चंदनाची रोपे वाटत पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभ साजरा

मालवण,दि.१७ जानेवारी

मकरसंक्रांती निमित्त सध्या घरोघरी सुवासिनींकडून हळदीकुंकू समारंभ आयोजित करून आलेल्या महिलांना वाण म्हणून विविध प्रकारच्या वस्तू देण्यात येत आहेत. मात्र मालवण येथील नर्सरी निर्मितीच्या मालक सौ. सायली संजय गोवेकर यांनी वाण म्हणून चंदनाची रोपे वाटत पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभाचा आदर्श निर्माण केला आहे. सौ. सायली व श्री. संजय गोवेकर हे गेली पाच वर्षे विविध प्रकारची रोपे वाटून लावण्याचा संदेश देत पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभ साजरा करत असून त्यांच्या या उपक्रमाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.

मकरसंक्रांती सणानिमित्त महिलांकडून आपापल्या घरी हळदीकुंकू समारंभ आयोजित करून समाजातील इतर महिलांना घरी निमंत्रित करून त्यांना तिळगुळ, फुले व वस्तुरूपी वाण देण्याची प्रथा आहे. यामध्ये वाण म्हणून दैनंदिन गरजेच्या वस्तू वाटल्या जातात. यामध्ये साखर, गूळ, रवा, कडधान्ये, साबण, खाद्य पदार्थ, छोटी भांडी अशा विविध गोष्टींसह प्लास्टिकच्या वस्तुही मोठ्या प्रमाणावर वाटल्या जातात. प्लास्टिक वस्तूंचे प्रमाण वाढत असल्याने मालवण येथील निर्मिती नर्सरीचे मालक संजय गोवेकर व त्यांच्या पत्नी सौ. सायली गोवेकर यांनी गेल्या पाच वर्षा पासून विविध झाडांची रोपे वाण म्हणून देण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षात त्यांनी आपल्या घरी आयोजित हळदीकुंकू समारंभात अनंत, चाफा, सदाफुली, तुळस, हिरवा चाफा अशा झाडांची रोपे वाटली असून यावर्षी त्यांनी चंदनाच्या झाडाची रोपे वाण स्वरूपात वाटली.

प्लास्टिकच्या वस्तू वाण म्हणून देण्यापेक्षा झाडाची रोपे दिल्याने पर्यावरण पूरक हळदीकुंकू समारंभ साजरा करता येतो, यामुळे महिलांना झाडे लावण्याची प्रेरणा व प्रोत्साहन मिळते, झाडे लावा झाडे जगवा या संकल्पनेस एक प्रकारे या उपक्रमामुळे हातभार लागत आहे, असे सौ. सायली गोवेकर व संजय गोवेकर यांनी सांगितले. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन इतर महिलाही रोपे वाटण्यासाठी आमच्याशी संपर्क साधता असून आम्हीही त्यांना सहकार्य करत आहोत, असेही गोवेकर दांपत्याने सांगितले. गोवेकर यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.