विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल… विठू माऊलीचा विजय असो…

श्री देव विठोबा देवालयाचे नूतनीकरण होऊन मंदिराच्या कलशारोहण सोहळा

मालवण,दि.२६ एप्रिल

विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल… विठू माऊलीचा विजय असो… पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष करीत… ढोल ताशांच्या गजरात… फटाक्यांच्या आतषबाजीत… असंख्य भाविकांच्या उपस्थितीत आज देवबाग येथील श्री विठोबा देवालयावर श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज आणि पूज्य रमेश महाराज यांच्या हस्ते कलशाचे आरोहण करण्यात आले. या सोहळ्यानिमित्त देवबागवासीयांसह हजारो भाविकजन विठू नामाच्या गजरात दंग झाल्याने देवबाग गावात जणू विठू नामाची शाळा भरली

देवबाग येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसेच विशेषतः अन्नब्रह्म अशी खास ओळख असलेल्या श्री देव विठोबा देवालयाचे नूतनीकरण होऊन मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त दि. १६ एप्रिलपासून विविध कार्यक्रम मंदिरात होत असून कलशारोहणाचा मुख्य समारंभ आज चैतन्यमय व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त आज सकाळी ७ वाजल्यापासून देवतामूर्ती व कलशाला जलाधिवास, श्री गणेश व श्री शिवपिंडी प्रतिष्ठापना आदी धार्मिक विधी संपन्न झाले. यजमानी म्हणून श्री. किशोर नांदोस्कर व सौ. नेत्रा नांदोस्कर या दाम्पत्याच्या हस्ते हे विधी झाले. यावेळी मंदिराचे पुजारी सुरेश काळे तसेच पुरोहित मंदार मेहंदळे (सांगली), आदित्य दाते, चैतन्य कुळकर्णी, राजेश जोशी, केदार मेहंदळे यांच्या पौरहित्याखाली हे विधी संपन्न झाले. त्यानंतर आज श्री नवनाथ श्रध्दास्थान तपोभूमी मुळदे कुडाळ येथील नवनाथ उपासक प. पू. बाळकृष्ण घडशी महाराज व पूज्य रमेश महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंदिरावर कलशारोहण करण्यात आले. यावेळी सनातन संस्थेचे सद्‌गुरु सत्यवान कदम उपस्थित होते. कलशारोहण होताच फटाक्यांची आतषबाजी करून उपस्थित भाविकांनी विठू नामाचा गजर केला. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात आणि भगवे झेंडे फडकवत महिला व ग्रामस्थांनी मंदिराभोवती प्रदक्षिणा केली.

त्यानंतर श्री विठ्ठल व रखुमाईची बहुसंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. त्यानंतर आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी श्री ब्राह्मणदेव सांस्कृतिक दिंडी मंडळ, आचरा-पारवाडी यांची दिंडी सादर झाली तर रात्री देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार मंडळ कवठी यांचा ‘अजिंक्य मणी’, हा पौराणिक नाट्यप्रयोग संपन्न झाला.

यावेळी श्री विठोबा देवालय विश्वस्त मंडळाचे सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ आणि हजारो भाविकजन उपस्थित होते.

या सोहळ्या निमित्त शनिवार दि. २७ एप्रिल रोजी रात्री १० वा. वावळेश्वर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘अघोर लक्ष्मी’, दि. २८ एप्रिल रोजी रात्रौ १० वा. खानोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘मातृवात्सल्य’, सोमवार, दि. २९ एप्रिल रोजी श्री भूमिका देवी दशावतार (नितीन आशयेकर) यांचा पौराणिक रात्रौ १० वा. नाट्य प्रयोग ‘चित्रांगी गंधर्व उ‌द्धार’ सादर होणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी श्री विठ्ठल रखुमाई मुर्ती प्रतिष्ठापनेचा ७९ वा वर्धापन दिन सोहळा साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी ७ वा. श्रींच्या मुर्तीवर दुग्धाभिषेक, सकाळी ८ वा. ओटी भरणे कार्यक्रम सायं. ४ वा. श्री सत्यनारायण महापूजा, सायं. ६. वा. पुराण वाचन, पालखी प्रदक्षिणा, महाआरती व तीर्थप्रसाद, रात्री ८ वा. भजनाचा कार्यक्रम, रात्री १० वा. आरोलकर दशावतार नाट्यमंडळ यांचा पौराणिक नाट्यप्रयोग ‘पुष्करणी तीर्थ’ दि. १ मे रोजी पहाटे ५ वा. काकड आरती, दुपारी १२ ते ३ वा. महाप्रसाद, रात्री १० वा. जिल्हास्तरीय ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. तरी सर्वांनी या सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन श्री देव विठोबा देवालय, देवबाग विश्वस्त व ग्रामस्थ यांनी केले आहे.