ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना दिले निवेदन;गावाची होणारी नाहक बदनामी खपवून घेतली जाणार नसल्याचा इशारा
कणकवली दि.१७ जानेवारी(भगवान लोके)
लोरे गावची विकासात्मक चाललेली घोडदौड व ग्रामपंचायतमध्ये वारंवार होणारा पराभव पचवू न शकल्यामुळे विरोधकांकडून विकास कामांबाबत नेहमी होणारी तक्रारी या चुकीच्या आहेत.त्याबाबत संबंधित गावच्या लोकांनी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांना निवेदन दिले आहे.
गटविकास अधिकारी कणकवली याना दिलेल्या निवेदनात म्हटले की,आम्ही लोरे गावचे ग्रामस्थ आपणास असे निदर्शनास आणून देतो कि,काही निवडक लोक आपल्या कार्यालयात येऊन गांगेश्वर ते सोनारवाडी रस्त्यावर अतिक्रमण केले असल्याची तक्रार केल्याचे समजले. आम्ही या रस्त्याचे लाभधारक आहोत (गावठणवाडी,गुरववाडी,हरिजनवाडी आणि सोनारवाडी ग्रामस्थ )सदर रस्त्यावर वर कुठल्याही प्रकारचे अतिक्रमण किंवा वाहतुकीस अडथळा निर्माण होत नाही. आम्हा सर्व लाभधारकांच्या दोन चाकी ,चारचाकी ,सहा चाकी गाड्या ( स्कुटर,ट्रक, ट्रॅक्टर डंपर ) या रस्त्यावरुन सुरळीत चालू आहेत. श्री तुळशीदास रावराणे यांनी आपल्या दोन घरांच्या मधून रस्त्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण होऊ शकले. तसेच गावातील बहुसंख्य लोकांनी आपल्या स्वतःच्या मालकीच्या जमिनी स्वखुशीने दिल्यामुळे हे काम पूर्णत्वास आले.विरोधकांकडून होणारी तक्रार हा फक्त राजकीय स्टंट आहे,नेहमी विकास कामांना विरोध करायचा आणि गावामध्ये संभ्रह निर्माण करायचा हा एक कलमी कार्यक्रम त्यांचा चालला आहे. कुठल्याही कामाला त्यांनी स्वतःची जमीन दिली नाही पण लोकांच्या सहकार्यातून झालेल्या कामाचा ( लोकांच्या जमिनीतून केलेल्या रस्त्याचा )लाभ मात्र आनंदाने आणि बिन्धास्तपणे घेत आहेत.ग्रामपंचायतमध्ये विकास कामाचा आलेला निधी कश्या प्रकारे आणला जातो, कश्या प्रकारे खर्च केला जातो, कुणाची परवानगी घेतली जाते, याचे ज्ञान नसल्यामुळे नेहमी विरोधक विरोध करत असतात नेहमी ग्रामपंचायत मध्ये विविध तक्रारी देऊन ग्रामपंचायत आणि तेथील कर्मचाऱ्यांचा वेळ वाया घालवत असतात. सरकारी कामात हस्तक्षेप करत असतात.याबाबत ग्रामस्थांनी ग्रामसभेत सुद्धा तक्रारदार विरोधात ते करत असलेल्या बदनामी बाबत निषेधाचा ठराव सुद्धा घेतलेला आहे.”गावचा विकास हाच आमचा ध्यास” या ब्रिदवाक्याखाली सर्वांनी एकत्र येऊन काम करावे . यापुढे गावाची होणारी नाहक बदनामी खपवून घेतली जाणार नाही अशी सूचनाही केली आहे.