आंबा व काजू बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे…

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची तहसीलदार व कृषी विभागाकडे मागणी…

देवगड,दि.१८ जानेवारी

तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिक पूर्णतः धोक्यात आले असून थ्रीप्स्, तुडतुडे तसेच अन्य कीड रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एकीकडे फवारणी सुरूच असताना दुसरीकडे पाऊस झाल्याने फवारणी खर्च वाया गेला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी हवालदील झाले.असून शासनाने त्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता असून लवकरात लवकर पंचनामे करून आंबा जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी विशाल खत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

निवेदनात म्हटले आहे की,नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे देवगड तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले
आहे. आता थंडी सुरू झाल्याने आंबा, काजू कलमे मोहोरण्यास सुरूवात झाली होती. तर काही भागात झाडांवर बारीक आंबा फळेही तयार झाली होती. आंबा पीकासाठी पोषक वातावरण तयार होत असतानाच अचानक विजांचा लखलखाट करीत जोराचा पाऊस झाला. त्यानंतरही पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण कायम राहून
अधूनमधून पाऊस पडला. यामुळे आलेल्या मोहोराच्या फुलांमध्ये पाणी राहून मोहोर खराब झाला आहे. तसेच बारीक फळे गळून पडल्याने बागायतदारांना मोठी रक्कम मिळवून देणाऱ्या पहिल्या टप्यातील आंबा पीकाचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. थ्रीप्स्, तुडतुडे तसेच अन्य किडरोगांमुळे एकीकडे फवारणी सुरूच असताना दुसरीकडे पाऊस झाल्याने फवारणी खर्च वाया गेला आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी हवालदील झाले असून शासनाने त्यांना मदतीचा हात देण्याची आवश्यकता आहे. यासाठी पावसाने झालेल्या आंबा, काजू
पीकाच्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण होण्याची आवश्यकता आहे. यामुळे कृषि विभागाला तातडीने पंचनामे करण्यास सांगुन त्याचा वस्तुस्थितीदर्शक अहवाल शासनास सादर करण्यास सांगावे. त्यामुळे आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळू शकेल. तसेच पीकविमा कंपन्यांना याची माहिती देऊन तातडीने बागायतदारांना भरपाई देण्यासाठी आपल्या स्तरावर निर्देश देण्यात यावेत. पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या वस्तुस्थितीची पहाणी करण्यास सांगून तातडीने कृषि विभागाकडून सर्वेक्षण अहवाल मागवण्यात यावा. आगामी
आंबा हंगामाच्या अनुषंगाने तालुक्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून कलमांवर फवारणी करण्यास सुरूवात केली होती. मात्र अवकाळी पावसाने केलेली फवारणी वाया जावून नुकसान सोसावे लागले. तालुक्यातील आंबा, काजू बागायतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात येऊन आपली कैफियत मांडल्यामुळे झालेल्या नुकसानीचे कृषि विभागाकडून सर्वेक्षण करून शासनाकडून भरपाई देण्यात यावी अशी देवगड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी आहे. यावेळी कृषी विभागात देखील निवेदन देण्यात आले.

यावेळी तालुकाध्यक्ष प्रकाश गुरव,तालुका सरचिटणीस शरद शिंदे,तालुका उपाध्यक्ष शामकांत शेडगे,नागेश आचरेकर,कुणकेश्वर सोसायटी चेअरमन निलेश पेडणेकर,बाबा आचरेकर,प्रदीप मुणगेकर,बाबू वाळके,जयराम कदम,विश्वनाथ तेली,अशोक मुणगेकर,रमाकांत पेडणेकर,मधुसूदन बाणे,सत्यवान डोंगरेकर,अजय नानेरकर,ज्ञानदेव भडसाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.