कोकण विकास समितीने या हालचालींच्या विरोधात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार
मुंबई,दि.२९ एप्रिल
मुंबई ते मडगाव मार्गावर धावणार्या वंदे भारत एक्सप्रेसला 98 ते 100 टक्के प्रवासी भारमान असतानाही मंगळुरू ते मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याने मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट घातला जात आहे. या हालचालींना मुंबईपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. कोकण विकास समितीने या हालचालींच्या विरोधात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तीव्र विरोध दर्शवत चांगली चालत असलेली गाडी विस्तारित करण्याऐवजी काही चांगले पर्याय देखील सुचवले आहेत. मुंबई गोवा मार्गावर धावणारी वंदे भारत एक्सप्रेस (22229/22230) मंगळूरूपर्यंत विस्तारित केल्यास हा प्रयत्न हाणून पडण्याची तयारी कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींसह रेल्वे मंत्रालयाला या संदर्भात पत्राद्वारे इशारा देण्यात आला आहे.
मंगळुरु-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याची शिक्षा मुंबई-गोवा मार्गावरील प्रवाशांना का? मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला 100% प्रवासी भारमान असताना त्या गाडीचा विस्तार पुढे मंगळुरुपर्यंत विस्तार करून काहीही सध्या होणार नाही. दोन्ही मार्गावरील प्रवाशांना स्वतंत्र सेवा देण्यासाठी मंगळुरु – मुंबई दरम्यान नवीन गाडी सुरु करण्याची गरज आहे. त्यासाठी रेल्वे बोर्डाने दक्षिण रेल्वेलाच नवीन वंदे भारत किंवा अमृत भारत किंवा वंदे स्लीपर रेक देऊन त्यांच्या मार्फतच ती गाडी चालवण्यात यावी.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मंगळूर मडगाव (20645/20646) वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीपासूनच 98 ते 100% प्रवासी भारमान मिळत असलेली मुंबई सीएसएमटी ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस मंगळूरपर्यंत विस्तारित करण्याची मागणी दक्षिण कन्नडाचे खासदार नलीन कुमार कातिल यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयस्तरावर देखील या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. मात्र, याला कोकणसह गोव्यातून प्रचंड प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.