उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे श्रीराम प्राण प्रतिष्ठापनादिनी महाआरती

कणकवलीतील पटवर्धन चौकात होणार महाआरती;जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांची माहिती

कणकवली दि.१८ जानेवारी(भगवान लोके)

अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारीला होत आहे. त्या‌ अनुषंगाने उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे येथील आप्पासाहेब पटवर्धन चौक येथे २२ रोजी सकाळी १० वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आल्याची माहिती उद्धव ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली आहे.

तब्बल ५०० वर्षांनंतर अयोध्येत रामलल्ला विराजमान होत आहेत. आपल्या श्रद्धास्थानावरील हक्कासाठी चाललेला लढा यशस्वी झाला, ही बाब आनंददायी आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या निर्मितीसाठी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे प्रत्येक हिंदू बांधवाने हा दिवस सणासारखा साजरा करायला हवा, असे पारकर म्हणाले.

महाआरतीला आमदार वैभव नाईक, कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत, संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते, नागरिकांनी महाआरतीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पारकर यांनी केले आहे.