नवनाथ भोळे यांच्या शैक्षणिक उपक्रमाची राज्य स्तरावर दखल

उत्तराची चौकट मोडताना’ या उपक्रमाचे राज्यभरात कौतुक

आचरा,दि.१८ जानेवारी
मालवण तालुक्यातील दुर्गम भागातील पडेकाप या पूर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक नवनाथ पांडुरंग भोळे यांच्या ‘उत्तराची चौकट मोडताना’ महाशैक्षणिक उपक्रमाची दखल राज्यस्तरावर घेण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने प्रकाशित केलेल्या शिक्षणगाथा जानेवारी 2024 या त्रैमासिकासाठी या शैक्षणिक उपक्रमाची निवड झाली आहे. महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त मान श्री. सुरज मांढरे यांच्या संकल्पनेतून शिक्षणगाथा हे त्रैमासिक साकारले असून यात संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनव शैक्षणिक उपक्रमाची दाखल घेण्यात येते. जेणेकरून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांना शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी ते उपक्रम मार्गदर्शक ठरावेत.

याबाबत माहिती देताना भोळे म्हणाले की मुलांना अनेक प्रश्न पडतात हे का? हे कसे? प्रश्नातील ही जिज्ञासूवृत्ती अध्यापन करताना वापरावयास हवी असे वाटले. तेव्हा विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना जास्तीत जास्त उत्तरे कशी देता येतील याचा प्रयत्न केला. मुलांना सुरुवातीला एखाद्या वस्तूवर, पदार्थांवर प्रश्न तयार करायला लावले. तेव्हा त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार खूप छान प्रश्न तयार करू लागली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सहजता आली. त्यांची भीती कमी झाली. आता काही प्रश्नांची उत्तरे मुले स्वतः शोधायचा प्रयत्न करतात. या कामी शाळेतील सहशिक्षक श्री राजेंद्रप्रसाद गाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आणि त्याच शैक्षणिक उपक्रमात मी लिहिलेला ‘उत्तराची चौकट मोडताना’ महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारतीकडून प्रकाशित केल्या जाणाऱ्या वरील त्रैमासिकात माझा उपक्रम निवडला म्हणून मी बालभारती परिवाराचे मनापासून आभार व्यक्त करतो. यामुळेच माझ्या पडेकाप या दुर्गम शाळेतील उपक्रम महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शाळांमध्ये पोहोचण्यास मदत होणार आहे. नवनाथ भोळे यांच्या या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती पडेकाप, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मालवण, साने गुरुजी कथामाला व कोमसाप मालवण यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले.