मालवण ,दि.२ मे
चुनवरे येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देव जैन रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळ्याच्या निमित्ताने बुधवारी रात्री चुनवरेवासियांनी मंदिर व मंदिर परिसरात दिप पाजळून दीपोत्सवाचा आनंद लुटला. रात्रौच्यावेळी चांदण्या प्रकाशात लखलखत्या पणत्यांनी सारा परिसर उजळून निघाला
गेले दोन दिवस मालवण तालुक्यातील श्री देव जैन रामेश्वर मंदिराच्या कलशारोहण व जीर्णोद्धार सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडत असून काल चुनवरे येथील श्री देव जैन रामेश्वर मंदिराच्या परिसरात महिला वर्गानी आकर्षक रांगोळी काढली तर युवा मंडळींनी मंदिरात फुलांची आरास करुन दीप पाजळले . सायंकाळच्या वेळी मंदिर आणि परिसरात लखलखत्या दिव्यांची सजावट करण्यात आली. लखलखत्या दिव्यांनी मंदिर परिसर उजळून निघाला होता.
या सोहळ्याच्या निमित्ताने भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या भजन स्पर्धेत माऊली प्रासादिक भजन कणकवली बिडयेवाडी, दत्तप्रसाद प्रासादिक भजन मंडळ वर्दे, विश्वकर्मा प्रासादिक भजन मंडळ राठीवडे, महापुरुष प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ कणकवली हे सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उदघाटन मंडळाचे अध्यक्ष सोनू सखाराम परब यांच्या हस्ते झाले. यावेळी बाळकृष्ण श्रीधर परब, बाळकृष्ण महादेव परब, प्रभाकर राजाराम परब, बापू परब, आबा परब, विकास परब, लवू शंकर परब, पोलीस पाटील महेश परब, परीक्षक सागर राठोड, परीक्षक महेश परब यांच्या उपस्थितीत झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभुदास आजगावकर यांनी केले. स्पर्धेत सहभागी झालेल्या पाचही स्पर्धक संघांनी दर्जेदार भजन करून रसिकांची वाहवा मिळवली. यावेळी भजन रसिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते