इन्सुलीत दारुसह साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त – इन्सुली एक्साईजची कारवाई

बांदा,दि.३ मे
गोव्यातून सिंधुदुर्गात होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साइज विभागाने कारवाई केली. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचे ४५ बॉक्स (२ लाख ५८ हजार रुपये) जप्त केले. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली सुमारे ५ लाख रुपयांची कार असा एकूण ७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेकायदा दारू वाहतूक प्रकरणी गोपाळ सुरेश गावडे (३६, नेनेवाडी, चौकुळ) याला ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई इन्सुली साऊथ कोकण डिस्टलरीज फॅक्टरी जवळ करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा दारू वाहत होणार असल्याची माहिती इन्सुली एक्साईज विभागाला प्राप्त झाली होती त्यानुसार जुन्या मुंबई गोवा मारा मार्गावर सापळा रचना झाला होता गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एम एच ०७ क्यू ८६८५) तपासणीसाठी थांबविण्यात आली. यावेळी कार मध्ये विदेशी मद्याचे ४५ बॉक्स (९०० बाटल्या) आढळून आल्यात. त्याची बाजारभावाप्रमाणे किंमत २ लाख ५८ हजार रुपये आहे. तसेच दारू वाहतुकीसाठी वापरलेली कारही जप्त करण्यात आली.

सदर कारवाई दुय्यम निरीक्षक प्रदीप रासकर, तानाजी पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, जवान रणजीत शिंदे, दीपक वायदंडे यांच्या पथकाने केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील करीत आहेत.

चौकट
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोव्यातून महाराष्ट्रात होणाऱ्या दारू वाहतुकीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. दारू कारवाई केलेली कार गोवा पोलीस, गोवा एक्साईज चेकपोस्ट, बांदा पोलीस चेक नाका, इन्सुली एक्साईज चेकनाका यांना गुंगारा देण्यात यशस्वी झाली. बांदा पोलीस चेकपोस्टवर तर गाड्यांची तपासणी करण्यासाठी मोठा पोलीस फौजफाटा आहे. असे असतानाही सदर कार चालक पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी झाला. याबद्दल सर्वसामान्यांमधून मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.