मांगेली कुसगेवाडी येथील दगड खाणीत जिलेटीन स्फोट प्रकरणी पाच दिवस उलटून देखील गुन्हा दाखल नाही दोडामार्ग पोलिसांवर कुणाचा दबाव

दोडामार्ग, दि. ३ मे

दोडामार्ग तालुक्यातील ग्रामीण भागात वसलेल्या मांगेली कुसगेवाडी दुसगीचा नाला या ठिकाणी काळ्या दगड खाणीत जिलेटीन स्फोट होऊन एक परप्रांतीय कामगार मरण पावला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना होऊन पाच दिवस उलटले तरी दोडामार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही. दोडामार्ग पोलिसांवर कुणाचा दबाव आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. गंभीर घटना घडून अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. कुणाला वाचवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे.
दोडामार्ग पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी यांनी तातडीने कारवाई करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली जात आहे.

दोडामार्ग तालुक्यातील मांगेली गावात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास खडक फोडण्यासाठी नियमबाह्य पध्दतीने कामगाराला पुढे केले. यावेळी जिलेटीन स्फोट होऊन एका कामगाराल जीव गमवावा लागला एक जखमी झाला या घटनेनंतर दोडामार्ग तालुक्यात खळबळ उडाली. दोन्ही कामगाराला जखमी अवस्थेत नजीकच्या आरोग्य केंद्र रूग्णालयात दाखल न करता त्यांना पुरावा नष्ट करण्यासाठी परस्पर कर्नाटक मध्ये नेण्यात आले.
स्थानिक ठिकाणी प्राथमिक उपचार झाले असते तर कामगार वाचला असता पण रातोरात जखमी कामगार इतर कामगार याना घटनास्थळावरून बेळगाव येथे वाहन करून पाडवणे याला संबंधित व्यक्ती जबाबदार आहे. त्याच्या अशा वृत्तीमुळे एका कामगाराचा जीव गेला.
खाणीत घटना घडली. कुणी मुद्दाम केले नाही. घडलेल्या घटनेची माहिती खाण मालकाने लगेच पोलीस ठाण्यात दिली पाहिजे होती तसं झालं नाही त्यामुळे संशयास वाव मिळाला आहे.
मांगेली कुसगेवाडी दुसगीचा नाला या ठिकाणी काळ्या दगड खाणीत जिलेटीन स्फोट होऊन एका कामगाराचा बळी गेला तर एक जखमी झाला. या नंतर दोडामार्ग पोलिसांनी तीन वेळा खाणीत गेले बाॅम्बशोधक नाशक पथक जाऊन आले. घटनेनंतर स्थानिक पञकार यांनी दोडामार्ग पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांची भेट घेऊन विचारणा केली. यावेळी शवविच्छेदन अहवाल इतर रिपोर्ट बेळगाव येथून उपलब्ध होताच गुन्हा दाखल केला जाईल असे सांगितले. शिवाय उपविभागीय महिला पोलीस अधिकारी यांनी मांगेली गावात घटनास्थळी भेट दिली.