वेंगुर्ला,दि.४ मे
उभादांडा येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर झाडांची लागवड व सांडपाण्याचा चिखल करून विद्यार्थी व शिक्षकांना त्रास सुरू असल्याप्रकरणी गटविकास अधिका-यांनी प्रत्यक्ष वस्तुस्थितीची पहाणी केली आणि रस्ता मोकळा करून देण्याची ग्वाही दिल्यावर पालक, माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी ग्रामस्थांनी लोकसभा निवडणूकीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. तशाप्रकारचे निवेदन गट विकास अधिकारी, पंचायत समिती वेंगुर्ला यांना दिले आहे.
सदरच्या प्रस्तावित बहिष्काराचे शेकडो सह्यांचे निवेदन उभादांडा गावातील या शाळेत शिकणाया विद्यार्थ्यांचे पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि संपूर्ण गावातील शिक्षणप्रेमी जनतेने जिल्हाधिकारी यांना सादर केले होते. यात त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा मोठा निर्णय घेतला होता.
दरम्यान, दिनांक ०३ मे रोजी याबाबत वेंगुर्ला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी शाळेला प्रत्यक्ष भेट देऊन वस्तुस्थितीची पहाणी केली. त्यानंतर शाळेकडे जाण्यासाठीचा रस्ता मोकळा करून देण्याची ग्वाहीही दिली. त्यामुळे माजी विद्यार्थी, पालक आणि समस्त शिक्षणप्रेमी यांनी लोकसभा निवडणूकीवरील प्रस्तावित बहिष्कार मागे घेत असल्याचे प्रशासनाला निवेदनाद्वारे कळविले आहे.
तसेच प्रशासनाच्या या तात्काळ कारवाईला प्रतिसाद म्हणून समस्त ग्रामस्थना येत्या ७ मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन शिक्षणप्रेमी मंडळीकडून करण्यात आले आहे.