क्षेत्रीय अधिकारी , मायक्रो ऑब्झर्व्हर , क्रेंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी , पोलीस मिळून २३२४ कर्मचारी तैनात ; दिव्यांग व्यक्तींसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघराची व्यवस्था ..
कणकवली दि. ६ मे ( भगवान लोके )
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी ७ मे रोजी मतदान होणार आहे. ३३२ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून सोमवारी २० टेबलवरून साहित्य वाटप करण्यात आले. ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी , मायक्रो ऑर्ब्झवर , क्रेंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी , पोलीस मिळून २३२४ कर्मचारी नेमणूका करण्यात आल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी व लहान मुलांसाठी पाळणाघराची विशेष व्यवस्था करण्यात आली असून कर्मचारी मतदान साहित्य घेवून ४५ एसटी, ५ जीप गाड्यांच्या मदतीने कणकवली , देवगड व वैभववाडी तालुक्यातील विविध मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत.
कणकवली महाविद्यालयाच्या पटांगणावर मतदान साहित्य वाटप प्रक्रीया सोमवारी पार पडली. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी जगदीश कातकर , कणकवली तहसिलदार दीक्षांत देशपांडे , वैभववाडी तहसिलदार सूर्यकांत पाटील, देवगड तहसिलदार संकेत यमगर आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक कृषिकेश रावले ,उपविभागीय पोलिस अधिकारी घनश्याम आढाव यांनी भेट देऊन प्रक्रियेची पाहणी केली. दरम्यान , कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे. मतदान प्रक्रीया शांततेत पार पडावी यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्यात येत आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघात – ३३२ मतदान केंद्र असून २०टेबल वरून मतदान साहित्य वितरित करण्यात आले. २३२४ निवडणूक कर्मचारी, त्यात पोलिसांसह ४७ झोनल अधिकारी , ३८ मायक्रो ऑब्झर्व्हर , ४५ एसटी , ५ जीप , या गाड्यांच्या मदतीने ३३२ केंद्रांपैकी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्राध्यक्ष , मतदान अधिकारी एक, दोन व तीन, पोलिस कर्मचारी तसेच दिव्यांगांसाठी स्वयंसेवक, पाळणाघरासाठी अंगणवाडी अथवा आशा स्वयंसेविका व व्यवस्थापक तैनात असणार आहेत.