पोईप येथील वेताळ मुंजेश्वर मंदिरात २२ रोजी विविध कार्यक्रम

मालवण,दि.१८ जानेवारी

अयोध्या येथे दि. २२ जानेवारी रोजी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उदघाटन सोहळ्या निमित्त पोईप येथील श्री देव वेताळ मुंजेश्वर मंदिर येथे पोईप ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यानिमित्त सकाळी ९.३० वाजता श्री देव मुंजेश्वर मंदिरात अभिषेक, सकाळी १०. ३० वा. श्री देव वेताळ मंदिरात पूजा अर्चा व राम नामाचा जप, दुपारी १२ वा. महाआरती व तीर्थ प्रसाद, सायंकाळी ७ वा. दीपोत्सव, रात्री ९ वा. महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.

यानिमित्त दुपारी ३ वा. पोईप ग्रामस्थ व भजन प्रेमी यांच्या वतीने निमंत्रित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा होणार आहे. यामध्ये बुवा संजय मालंडकर (नांदोस), बुवा अण्णा भिडे (आडवली भटवाडी), बुवा अक्षय परुळेकर (वायरी मालवण), बुवा ऋषिकेश गावडे (गोळवण), बुवा मंदार मेस्त्री (हळवल), बुवा जय राऊळ (पिंगुळी) हे सहभागी होणार आहेत. विजेत्यांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण रात्री ११ वाजता होणार आहे. तरी पोईप पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भजन रसिकानी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.