कणकवली पंचायत समिती समोर लोरे ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती ; उशिरापर्यंत आंदोलन

कणकवली दि .१८ जानेवारी(भगवान लोके)

लोरे नं. १ गावातील गांगेश्वर ते सोनारवाडीपर्यंतच्या रस्त्यावर विद्यमान सरपंच अजय रावराणे यांनी अतिक्रमण केले आहे असा आरोप ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व लोरे येथील काही ग्रामस्थांनी केला आहे.तसेच त्यासंदर्भात गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्याकडे तक्रार करून देखील त्यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे ठाकरे शिवसेना गटाचे पदाधिकारी व लोरे ग्रामस्थांनी कणकवली पंचायत समिती समोर गुरुवारी धरणे आंदोलन उशिरापर्यंत केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभा मतदार संघ प्रमुख सतीश सावंत, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, विलास गुडेकर, भालचंद्र दळवी, कन्हैया पारकर, अनुप वारंग, धीरज मेस्त्री, कणकवली महिला तालुका संघटक वैदेही गुडेकर, दिव्या साळगावकर, माधवी दळवी, संजना कोलते, लोरे येथील राजू रावराणे, निलेश राणे, चंदू रावराणे, विशाल राणे, रमेश राणे, प्रितम रावराणे, योगेश रावराणे, वैभव देवलकर, उत्तम पेडणेकर, प्रकाश गुरव, दौलत रावराणे, वाघेरी येथील उपसरपंच स्नेहल नेवगे, ग्रापं सदस्या कविता कदम, सिद्धेश रावराणे, श्रीकांत रावराणे, विश्राम रावराणे, मुरलीधर रावराणे, दत्तात्रय रावराणे, प्रकाश वाघेरकर, तुकाराम गुरव, शरद सरंगले आदी उपस्थित होते.
अतिक्रमण करणाऱ्या’ लोरे सरपंचावरती कारवाई झालीच पाहिजे’, ‘आपला विकास की गावचा विकास’ अशा घोषणा देत पंचायत समितीच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. या दरम्यान गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांना भेट दिली.
यावेळी लोरे नं. १ येथील गांगेश्वर ते सोनारवाडी येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्ता बांधण्यात आला असून या रस्त्यावर लोरे सरपंचांनी अतिक्रमण केले आहे. परिणामी या रस्त्यावरून मोठ्या गाड्या जाऊ शकत नाहीत. त्यामुळे लोरे सरपंचांवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणी लोरे ग्रामस्थांनी केली. त्यावर अरुण चव्हाण म्हणाले पंचायत समितीच्या बांधकाम विभागामार्फत पाहणी करून तेथील अधिकृत तांत्रिक अहवाल देण्यात येईल. त्यानंतर योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी दिले. जोपर्यंत तांत्रिक अहवाल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा लोरे ग्रामस्थांनी घेतला होता.त्यामुळे रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरूच होते.