शहरातील अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर वाहन उभे केले तर चाकातील हवा काढण्यात येईल…

सावंतवाडी दि.१० मे 
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सावंतवाडी शहरातील अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर वाहन उभे केले तर चाकातील हवा काढण्यात येईल असा फलक लावण्यात आलेला असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
सावंतवाडी शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या काझी शहाबुद्दीन हाॅल रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा बंगला आहे.या बंगल्याची गेट बंद ठेवण्यात आली आहे. मात्र या गेटवर एक इशारा देणारी पाटी अर्थात नोटीस बोर्ड लावण्यात आला आहे.या मध्ये म्हटले आहे, सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी, गेटसमोर वाहने पार्किंग करु नये. वाहन पार्क केल्यास चाकातील हवा काढण्यात येईल ” असा इशारा दिला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरील रस्ता नगरपरिषदेचा आहे. हा रस्ता वर्दळीचा असून सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालय, जीवन प्राधिकरण कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, काझी शहाबुद्दीन हाॅल, मजूर सहकारी संस्था आणि महामार्ग उप विभागीय कार्यालय आहे. त्यामुळे या रस्त्यावर गर्दी, वर्दळ असते. त्यामुळे साहजिकच वाहन पार्क केली जावू शकतात. मात्र बांधकाम खात्याच्या साहेबांनी वाहन पार्क केल्यास चाकातील हवा काढण्यात येईल असा इशारा दिला आहे त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.