सावंतवाडी दि.११ मे
काजू उत्पादक शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत आफ्रिकेत जाऊन प्रचार करा असा सल्ला उमेदवारांना दिला त्या काजू बी ला दोडामार्ग तालुक्यातील भेडशी बाजारात प्रति किलो १२२ रूपये दर मिळाला. त्यामुळे काजू बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत.
दोडामार्ग तालुक्यातील भेडशी चा आठवडा बाजार शनिवारी असतो. आजच्या बाजारात काजू बी ला प्रतिकीलो १२२ रूपये भाव मिळाला. शेतकरी आठवडा बाजारात काजू बी विकून मिळालेल्या पैशातून बाजारहाट करून घरी सामान घेऊन जातो. काजू बी ला भाव चांगला मिळत नसल्याने शेतकरी बागायतदारांनी चिंता व्यक्त केली जात.
काजू बी ला प्रतिकीलो हमीभाव मिळावा म्हणून शेतकरी बागायतदारांनी आंदोलने केली. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार प्रति किलो २०० रूपये हमीभाव मिळावा म्हणून मागणी केली. या पार्श्वभूमीवर आंदोलन छेडले. मात्र राज्य सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. तसेच निवडणुकीच्या तोंडावर काजू बी ला हमीभाव आणि अनुदान जाहीर केले होते पण त्याची अंमलबजावणी झाली नाही. आचारसंहिता लागू झाली असल्याने काजू बी ला हमीभाव आणि अनुदान देण्याबाबत धोरण अंमलबजावणी शक्य नाही.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू बागायतदार शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. काजू उत्पादन म्हणजे पिवळं सोनं म्हटले जाते मात्र सोनं महागले पण काजू बी ला भाव मिळत नाही. आफ्रिकन काजू बी आयातीवर निर्बंध घातले तरच काजू बागायतदार शेतकरी समाधानी होईल अन्यथा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही असे बोलले जात आहे.