स्थानिक नगरसेवकांना मात्र नागरिकांबद्दल चिंता नाही,राजकीय नेतेमंडळी निवडणुकीच्या धामधुमीतून अद्याप बाहेर पडली नाही,जनतेमधून नगरसेवकांबद्दल तीव्र संताप
देवगड,दि .११ मे(गणेश आचरेकर)
पंपिंग यंत्रणेतील बिघाडामुळे देवगड जामसंडेमधील पाणीप्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.पंपींग दुरूस्तीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.दुरूस्तीअंती पाणीपुरवठा सुरू होईल असे नगराध्यक्षा साक्षी प्रभु यांनी सांगीतले दरम्यान वारंवार पाणीपुरवठा याना त्या कारणाने बंद पडत असल्यामुळे देवगड जामसंडेमधील नागरिकांना पाणी मोठी किंमत मोजून विकत घ्यावे लागत आहे.लोकसभा निवडणूक मतदान प्रक्रिया आटोपली तरीही राजकीय नेतेमंडळी निवडणुकीच्या धामधुमीतून अद्याप बाहेर पडली नसून त्यांना जनतेच्या पाण्याचे काहीही देणेघेणे नाही अशा स्थितीत देवगडमधील राजकीय नेतेमंडळी आहेत याबद्दल नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दहिभाव नळयोजनेची वारंवार पाईपलाईन फुटणे नदीपात्रातील पाण्याची पातळी कमालीची घटणे यामुळे देवगड जामसंडेचा पाणीप्रश्न वरचेवर गंभीर होतो.त्यातच पाईपलाईन फुटल्यानंतर पाणीपुरवठा चार-चार दिवस बंद राहतो यामुळे नागरिकांवर भीषण पाणीसंकट उद्भवते असे असतानाच आता पंपीग यंत्रणेत बिघाड झाल्याने पाणीपुरवठा बंद आहे.दुरूस्तीसाठी कोल्हापूर येथून पंप दुरूस्त करणारी यंत्रणा बोलावली आहे.यामुळे पंप दुरूस्त होताच पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल अशी माहिती नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी दिली.मात्र पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न उद्भवूनही राजकीय नेतेमंडळी गप्प आहेत.सध्या नागरिकांना मोठी किंमत मोजून पाणी विकत घ्यावे लागत आहे.पुर्वी एक हजार लिटर पाण्याचा टाकीसाठी पाणी विक्री करणारे व्यावसायिक संबंधित पाणी विक्रेत्या टेम्पोधारकांकडून ५० रूपये घेत आता १०० रूपये घेत असल्याने पाणी विक्रेते टेम्पोधारक नागर{कांकडून ३५० रूपयांवरून ४५० रूपये घेत आहेत त्यात अंतर जास्त असल्यास ५०० ते ६०० रूपये नागरिकांना मोजावे लागत आहेत.सुट्टी पडल्याने बहुतांशी मंडळी गावी आली आहेत यामुळे घरातील माणसांची संख्या वाढली आहे.अशा सद्यस्थितीत वारंवार पाणीपुरवठा बंद राहत असल्याने भीषण पाणीटंचाईला देवगड जामसंडे वासीयांना सध्या सामोरे जावे लागले असून याची ना राजकीय नेतेमंडळींना चिंता , ना प्रशासनाला चिंता. निवडणुकीच्या धामधुमीतून स्थानिक राजकीय नेतेमंडळी, सत्ताधारी व विरोधी नगरसेवकही बाहेर पडले नसून कोणताही नगरसेवक देवगड जामसंडेमध्ये सध्या उद्भवलेल्या पाणीप्रश्नाकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.