चाकू हल्ला प्रकरणी हर्षल पराडकर याला न्यायालयीन कोठडी

मालवण,दि.११ मे

शेंडी पागण्याच्या कारणावरुन सर्जेकोट येथील संतोष सत्यवान शेलटकर (रा. कोळंब, खालचीवाडी) याच्यावर चाकुने वार करुन गंभीर दुखापत केल्याप्रकरणी अटक होऊन पोलीस कोठडीत असलेल्या हर्षल रविंद्र पराडकर याची पोलीस कोठडी संपल्याने पुन्हा मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यामुळे हर्षल पराडकर याची सावंतवाडी कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दहा दिवसांपूर्वी म्हणजेच दि. १ मे २०२४ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास संतोष सत्यवान शेलटकर व त्याचा मित्र जगन्नाथ अंकुश सावजी हे सर्जेकोट जेटीवर आले असता संशयित हर्षल पराडकर याने शेंडी पागण्याच्या कारणावरुन शिवीगाळ करुन हाताच्या थापटाने मारहाण करीत संतोष शेलटकर याच्या दंडावर, छातीवर व गालावर चाकूचे वार केले होते. याप्रकरणी मालवण पोलिस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार मालवण पोलिसांनी हर्षल रविंद्र पराडकर याला अटक करून त्याला मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यावर पराडकर याला आज पुन्हा न्यायालयात हजर केले असता त्याने जामीनासाठी अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने जामीनाची मागणी फेटाळून लावत पराडकर याला १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची रवानगी सावंतवाडी कारागृहात करण्यात आली.