चौके येथे खासगी लक्झरी बसेसमुळे होतेय वाहतूक कोंडी

मालवण,दि.११ मे

एप्रिल, मे या कालावधीत चौके येथील मुख्य नाक्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे नाक्यावर वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे चौके सरपंच गोपाळ चौकेकर, उपसरंपच पी. के. चौकेकर यांनी मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांची भेट घेऊन केली.

चौके येथील मुख्य नाक्यावर मालवण, कसाल, कुडाळ येथून मुंबईकर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. चौके बाजारपेठेत खासगी लक्झरी बसेस प्रवासी घेण्यासाठी तसेच पार्सल घेण्या- देण्यासाठी खूप वेळ थांबतात. या काळात मालवण, कसाल व कुडाळ या मार्गे वाहने आल्याने वाहतूक कोंडी होते. बाजारादिवशी वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाहनधारक व पादचारी यांच्यात भांडणे होतात. त्यामुळे लक्झरी बसेस, प्रवासी वाहने, बाजारपेठेच्या कार्यक्षेत्रात उभी करू नयेत, यासाठी सूचना कराव्यात. १२ मे, १९ मे, २६ मे या दिवशी चौके नाका येथे वाहतूक नियंत्रण पोलीस कर्मचारी नियुक्त करावा, अशी मागणी पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.

पोलीस निरीक्षक कोल्हे यांनी चौके सरपंच व उपसरपंच यांनी मांडलेल्या सूचनांनुसार बाजारपेठेत आवश्यक असणाऱ्या ठिकाणी पोलीस कर्मचारी अगर वाहतूक पोलीस शाखेकडे सूचना करून तेथून कर्मचारी नियुक्त करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्यावर सरपंच गोपाळ चौकेकर व उपसरपंच पी. के. चौकेकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.