बांदा महामार्गावर अपघात, तीन गाड्या एकमेकावर धडकल्या

सावंतवाडी,दि.११ मे
मुंबई गोवा महामार्गावर बांदा येथे कावेरी हॉटेल नजीक आज सायंकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान तीन गाड्यांमध्ये टक्कर होऊन अपघात झाला. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले. अपघाताची बातमी कळतात बांद्यातील सामाजिक कार्यकर्ते संदेश पावस्कर, भाजपा पदाधिकारी गुरु सावंत, मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी जखमी ना रुग्णालयात दाखल केले.
बांदा येथे उड्डाणपुलाचे काम चालू असल्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार गेले काही दिवस चालू आहेत. त्यातच संध्याकाळी पाऊस लागल्याने ट्राफिक जाम झाले होते. एक कंटेनर ट्राफिक मुळे रस्त्यावर थांबला असताना गोव्याकडून रत्नागिरीला जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सने त्याला धडक दिली. टेम्पो ट्रॅव्हल्सच्या मागे असलेला डंपर टेम्पो ट्रॅव्हल्सला धडकला. त्यामुळे टेम्पो ट्रॅव्हल्स मधील प्रवाशांना दुखापत झाली. रत्नागिरी कुवारबाव येथील हा टेम्पो असून कुवारबाव येथील प्रवासी गोव्याचे दर्शन करून पुन्हा रत्नागिरीला परतले होते. या टेम्पोमध्ये वीस प्रवासी होते. पैकी सहा प्रवासी जखमी झाले आहेत. जखमीना बांदा आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.