देवगड,दि. १९ जानेवारी
येथील उमाबाई बर्वे लायब्ररी, देवगड आयोजित देवगड तालुकास्तरीय वाचक स्पर्धेमध्ये श्री. संजीव आत्माराम राऊत यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. या वाचक स्पर्धेमध्ये कु. साक्षी सचिन राणे हिने द्वितीय तर कु. श्रुती विलास गावडे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. या विजेत्या तिन्ही स्पर्धकांची निवड जिल्हास्तरीय वाचक स्पर्धेसाठी झाली असून दिनांक २१ जानेवारी २०२४ रोजी कुडाळ येथील जिल्हा ग्रंथालयात ही स्पर्धा संपन्न होणार आहे. नाटककार मधुसूदन कालेलकर यांच्या पुस्तकावर परीक्षण हा विषय वाचक स्पर्धेसाठी देण्यात आला होता. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध साहित्यिका सौ अनुराधा दीक्षित, वाडा यांनी काम पाहिले. या स्पर्धेनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाबाई बर्वे ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. सागर कर्णिक यांनी केले . सौ. दीक्षित यांचे स्वागत संचालक सदस्य एस एस पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री कर्णिक यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी ग्रंथालयाचे संचालक सदस्य श्री एस. एस. पाटील, द. म. जोशी तसेच वाचकवर्ग, सेवकवर्ग आदी. उपस्थित होते. ग्रंथालयातर्फे सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रे व रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. ग्रंथालयातर्फे सर्व विजेत्या यशस्वी स्पर्धकांचे अभिनंदन करण्यात आले आणि पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.