तळेरे,दि.१२ मे
देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील आद्य पत्रकार कै.बाळशारत्री जांभेकर जांभेकर यांचे स्मारक पोंभुर्ले देऊळवाडी येथे आहे. ऐन उन्हाळ्यात या परिसरात पाण्याची भिषण टंचाई निर्माण झाली आहे. या परिसरात विहिर अथवा बोअरवेअर उपलब्ध नसल्याने परिसरातील महिला व पुरुषांना पाण्यासाठी दूरवरती पायपीट करावी लागत आहे. याबाबत शासनस्तरावरुन कोणतीही ठोस उपाययोजना किंवा प्रयत्न होत नसल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे या परिसरातील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न वर्षानुवर्ष तसाच प्रलंबित राहिला आहे.
महाराष्ट्राचे भूषण असलेल्या आद्य पत्रकार कै.बाळशारत्री जांभेकर यांच्या पोंभुर्ले येथील स्मारक ठिकाणी येणार्या पर्यटक,पत्रकार यांना पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळू शकत नाही ही बाब दुर्भाग्य पूर्ण आहे. याबाबत कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्याची ग्रामस्थांची आग्रही मागणी आहे. मात्र शासन स्तरावरुन यासाठी प्रयत्न व्हावे अशी पोंभुर्ले येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे. याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल असा इशारा बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील मुळ वंशज सुधाकर जांभेकर यांनी दिला आहे.