राम मेरे घर आना… प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारीला सुट्टी; महायुती सरकारचा मोठा निर्णय

मुंबई, दि.१९ जानेवारी
ज्या क्षणाची सर्वच राम भक्त आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर येऊन ठेपला आहे. येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या अयोध्येतील रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापनेला अवघे काही तासच शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात एकच राममय वातावरण पाहायला मिळत आहे. अशात महाराष्ट्रातील महायुती सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. अयोध्येतील रामलल्लाच्या मुर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आणि मंदिर लोकार्पणाचा भव्य दिव्य आणि ऐतिहासिक सोहळा पाहता यावा यासाठी येत्या २२ जानेवारीला महाराष्ट्रातही सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. नुकताच काल केंद्र सरकारने अधिकृत परिपत्रक जाहीर करत केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील शिंदे सरकारनेही या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयानुसार, सरकारी आणि खाजगी कार्यालयं, शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.