अज्ञात कार चालकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा

पादचाऱ्याला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची धडक ,पदाचाऱ्याचा जागीच मृत्यू;पलायन केलेला कारचा शोध सुरु

कणकवली दि.१७ मे(भगवान लोके)
मुंबई-गोवा महामार्गावर जानवली प्राथमिक शाळेनजीक रस्त्याने चालत जाणाऱ्या पादचाऱ्याला गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारने धडक दिली. त्यानंतर कारचालक घटनास्थळी न थांबता त्याने तिथून गोव्याच्या दिशेने पलायन केले. या धडकेत पादचारी अनिल कृष्णा कदम (५६, रा. जानवली बौद्धवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी अशोक कृष्णा कदम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात कार चालकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अपघात सकाळी ७ वा. च्या सुमारास झाला.
अनिल कदम हे गवंडी काम करत असून शुक्रवारी सकाळी ते मुंबई गोवा महामार्गावरून चालत कामावर जात होते. त्यादरम्यान गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या पांढऱ्या, पिवळ्या रंगाच्या पट्ट्या असलेल्या परमिट कारने अनिल कदम यांना धडक दिली. त्यानंतर त्या कारचालकाने कारसह तिथून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने पळून गेला. ही धडक एवढी जोरदार होती की अनिल कदम यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तसेच त्या कारच्या पुढील बाजूचा बंपर तुटून अपघातस्थळी पडला होता. अपघाताची माहिती मिळताच जानवली ग्रामस्थांनी व पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेऊन अनिल कदम यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. जानवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी कणकवली पोलीस ठाण्यास भेट देत अनिल कदम यांना धडक देऊन पलायन केलेल्या कारचालकाला लवकरात लवकर ताब्यात घ्यावे अशी मागणी केली. अनिल कदम यांना धडक देऊन पलायन केलेला कारचा शोध पोलीस घेत असून त्यांनी सर्व चेक पोस्टवर कारची माहिती दिली आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.