शिराळे गावची सुमारे  ४५० वर्षाची परंपरा असलेली’ गावपळण ‘शुक्रवारी दुपारनंतर सुरु

वैभववाडी, दि.१९ जानेवारी

शिराळे गावची सुमारे  ४५० वर्षाची परंपरा असलेली’ गावपळण ‘शुक्रवारी दुपारनंतर सुरु झाली आहे. शिराळेवासियांनी आपली गुरे ढोरे, कोंबडी, कुञ्यांसह नजीकच्या सडुरे गावच्या हद्दीत दडोबाच्या पायथ्याशी बांधलेल्या राहुट्यामध्ये आपले संसार थाटला आहे. देवीचा कौल होईपर्यंत  पुढचे काही दिवस तिथे वास्तव्य करणार असून अन्नधान्य व जीवनाश्यक वस्तुसह अबालवृध्द या गावपळणीत सहभागी झाले आहेत.
वैभववाडीपासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या कुशित वसलेले शिराळे हे स्वतंत्र महसूली गाव आहे. गावात सुमारे ८० कुटुंबे असून ३५० लोकसंख्या असलेले हे छोटेसे गाव आहे.  दरवर्षी षौष महिन्याच्या सुरुवातीला शिराळे गावची गावपळण होते.  गावचे ग्रामदैवत श्री गांगेश्वराने कौल दिल्यानंतर शुक्रवारी दुपारनंतर शिराळेवासियांनी गाव सोडले आहे. सडुरे गावच्या हद्दीत माळरानावर  ४० राहुट्या उभारुन या राहुट्यांमध्ये संसार थाटला आहे. राहुट्यांसमोरच गुरे बांधण्यासाठी गाताडी बांधल्या आहेत.
ज्या दिवशी घरातून बाहेर पडतात तो दिवस गृहित धरला जात नाही. गावपळणीनंतर पहीले तीन दिवस कोणीही ग्रामस्थ गावाकडे फिरत नाही.गावपळणी दरम्यान गावची प्राथमिक शाळाही राहुट्यानजीक असलेल्या आंब्याच्या झाडाखाली भरविली जाते.एस.टी.बस थांबाही तिथेच होतो. गावपळणी दरम्यान लगतच असलेल्या शुकनदी पाञातील झ-यातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरतात.
आजच्या सिमेंट काॕक्रिटच्या दुनियेतून बाहेर येऊन  शिराळेवासीय गावपळणी दरम्यान निर्सगाच्या सानिध्यात एकञ कुटुंब पध्दतीने राहात आहेत. टी.व्ही. मोबाईलच्या दुनियेत हरवलेला थेट संवाद या गावपळणी दरम्यान ग्रामस्थांमध्ये पहायला मिळत आहे. दिवसभर ग्रामस्थ  गप्पा गोष्टी करतात, मुले मनसोक्त खेळतात बागडतात, तर राञी भजन करत आनंद घेतात.
तीन दिवसानंतर परत ग्रामदैवताला कौल लावून गांगेश्वराला कौल लावून हुकूम घेतला जातो. देवाने हुकुम दिल्यानंतर पाच किंवा सात दिवासाने परत गावात जातात.दरवर्षी गावपळण होणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिराळे हे एकमेव गाव आहे. दरवर्षी होणारी ही गावपळण ग्रामस्थ देवाचे वार्षिक म्हणून मोठ्या श्रध्देने या गावपळणीत सहभागी होतात. या गावपळणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानीही गावात दाखल होतात.