मालवणच्या बंदर जेटीवर श्री रामलल्लाची भव्य 30 फुटी प्रतिमा उभारली जाणार- उपाध्यक्ष विजय केनवडेकर

0

मालवण दि.१९ जानेवारी
अयोध्येत येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवणच्या बंदर जेटीवर श्री रामलल्लाची भव्य 30 फुटी प्रतिमा उभारली जाणार आहे. तसेच याठिकाणी २५ हजार इलेट्रिक दिव्यांची आकर्षक विद्युत रोषणाई करून भव्य दिव्य दीपोत्सव साजरा केला जाणार असून २०० आकाश कंदील सोडले जाणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिली आहे.

पौष शुल्क द्वादशी विक्रम संवत 2080 सोमवार दिनांक २२ जानेवारी २०२४ या शुभ दिनी अयोध्या येथे श्रीरामाच्या नूतन बालमूर्ती नवनिर्मिती श्रीराम मंदिरातील गर्भगृहात स्थापित करून त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. यावेळी अयोध्येत अवर्णनीय आनंदमय वातावरण असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या परिसरातील मंदिरामध्ये सकाळी ११ ते १.३० या काळात रामभक्ताना एकत्र करून १०८ वेळा जप करावा. तर सायंकाळी ७ वाजता आपल्या घरासमोर पाच पणत्या लावून दीपप्रज्वलन करावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे औचित्य साधून भाजपचे मालवण कुडाळ विधानसभा संयोजक निलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण बंदर येथे ३० फूट उंच असणारी भव्य प्रभू रामचंद्र प्रतिमा उभी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सायंकाळी ७ वाजता माजी खासदार निलेश राणे व मालवण शहरातील देवस्थान विश्वस्त यांच्या उपस्थितीमध्ये मालवण बंदर जेटी येते २५ हजार इलेक्ट्रॉनिक दिव्यांची आकर्षक रोषणाई टप्प्याटप्प्याने प्रज्वलित करून भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

रात्रो ८ वाजता दोनशे आकाश कंदील प्रज्वलित करून आकाशात सोडण्यात येणार आहेत. हा भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व मालवणवासीयांनी मोठ्या संख्येने बंदर जेटी येथे उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी मालवणतर्फे करण्यात येत आहे.