वेंगुर्ला ,दि.२० जानेवारी
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पॅव्हेलियन हॉलमध्ये १७ व १८ जानेवारी रोजी भाजयुमो आयोजित ‘नमो चषक‘ अंतर्गत जिल्हास्तरीय बॅडमिटन स्पर्धा संपन्न झाली. यात पुरूष एकेरीमध्ये मुकुंद तळेकर विजेता ठरला.
उद्घाटन भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेल तेली यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपाचे सुहास गवंडळकर, निशू तोरसकर, बाबली वायंगणकर, दिलीप गिरप, केतन आजगांवकर, रविद्र प्रभूदेसाई उपस्थित होते. ८९ स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत पुरूष एकेरीमध्ये मुकुंद तळेकर (प्रथम), स्वप्निल सावंत (द्वितीय), पुरूष दुहेरीमध्ये निखिल गवळी व अथर्व पोरे (प्रथम), अनमोल गिरप व ऋषिकेश रेडकर (द्वितीय), महिला एकेरीमध्ये सुफीया शेख (प्रथम), श्रेया सामंत (द्वितीय), दुहेरीमध्ये सुफिया शेख व गौराई खवणेकर (प्रथम), सबा शेख व तबस्यूम शेख (द्वितीय) यांनी क्रमांक पटकाविला. पुरूष व महिला एकेरीतील विजेत्यांना रोख ३ हजार व ट्राॅफी तर उपविजेते यांना रोख २ हजार व ट्राॅफी तसेच पुरूष व महिला दुहेरीतील विजेत्यांना रोख ४ हजार व ट्राॅफी, उपविजेत्यांना रोख ३ हजार व ट्राॅफी अशी बक्षिसे देण्यात आली. बक्षिस वितरण प्रसन्ना देसाई व दिलीप गिरप यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा संयोजक हेमंत गावडे यांच्यासह भाजयुमोचे भूषण आंगचेकर, प्रणव वायंगणकर, उमेश नाटेकर, हमिद शेख, श्रीकांत सामंत आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी रेफ्री म्हणून रविद्र प्रभूदेसाई, केतन आजगांवकर, अजित धारगळकर, नंदकुमार प्रभूदेसाई यांनी काम पाहिले. माजी आमदार राजन तेली व युवा प्रदेश उपाध्यक्ष प्रथमेश तेली यांनी सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.