मालवण दि.२० जानेवारी
मालवण शहरात कचरा प्रश्न गंभीर बनला आहे. बाजारपेठ तसेच समुद्र किणाऱ्यावर कचऱ्याचे ढीग अधिक प्रमाणात जमा होत आहेत. मोकाट कुत्रे व जनावरे ही कचरा सर्वत्र पसरवत आहेत. त्यामुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधीचे साम्राज्य वाढत आहे. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली स्वछता मोहीम तसेच कचरा उचल प्रक्रिया योग्य पद्धतीने राबविण्यात येत नसल्याने ही गंभीर समस्या वाढत चालली आहे. नगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून तात्काळ उपाययोजना करावी. अन्यथा या संपूर्ण प्रकाराची तक्रार केंद्रीयमंत्री नारायण राणे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. अशी माहिती भाजपा युवामोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.
मालवण शहर पर्यटनाच्या माध्यमातून विकसित होत आहे. लाखोंच्या संख्येने देशी विदेशी पर्यटक मालवणाला भेट देतात. बाजारपेठ तसेच समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची गर्दी असते. मात्र याचं ठिकाणी कचऱ्याची समस्या गंभीर रूप बनली आहे. मालवण नगरपरिषद स्वच्छता विभागाच्या माध्यमातून काही वेळा स्वच्छता मोहीम राबविली जाते. मात्र, कचऱ्याची स्थिती जैसे थे पाहता स्वच्छता मोहीम केवळ दिखावा व फोटोसेशन ठरत आहे. मालवण नगरपरिषद स्वच्छता विभागामार्फत सकाळच्या सत्रात कचरा उचल गाडी फिरते. मात्र, काही वेळानंतर त्याच्यठिकाणी पुन्हा कचऱ्याचा प्रश्न प्रमुख्याने दिसुन येतो. अनेक ठिकाणी वाढत चाललेले कचऱ्याचे ढीग मोकाट कुत्रे, जनावरे हे पसरवतात. त्यामुळे अधिकच घाण व दुर्गंधी दिसून येते. याबाबत पालिका प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत योग्य नियोजन करावे. मालवण नगरपरिषद प्रशासनाने या संपूर्ण ठिकाणी पाहणी करावी. कचरा कश्यामुळे वाढतो. याबाबतही माहिती घ्यावी. रात्रीच्या वेळी पुन्हा कचरा गाडी फिरवण्यात यावी. मुख्याधिकाऱ्यांनी यात स्वतः लक्ष घालावा. कचरा समस्याप्रशनी कायमस्वरूपी मार्ग काढावा. अशी मागणी ताम्हणकर यांनी केली आहे.