मुरकर गुरुजी चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम;दिवाकर मुरकर यांची माहिती
कणकवली दि.२० जानेवारी(भगवान लोके)
मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा मारूती तुकाराम मुरकर यांच्या स्मरणार्थ’ शिक्षण गौरव पुरस्कार’ येथील विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक पी.जे. कांबळे यांना जाहीर झाला आहे.याबाबतची माहिती मुरकर गुरूजी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.दिवाकर मुरकर यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पी.जे. कांबळे यांनी विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेमध्ये शैक्षणिक प्रगतीसाठी भरीव कामगिरी केली आहे.एक शिक्षक म्हणून त्यांनी विद्यार्थी, पालक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सुसंवाद ठेवून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी योगदान दिले आहे. त्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार २६ जानेवारी रोजी कणकवली येथील प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
दरम्यान, पी.जे. कांबळे यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याने शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे कौतुक होत आहे.