मुंबई बाहेरील रुग्ण व नातेवाईकांच्या गैरसोयीकडे वेधणार लक्ष
कणकवली दि.२० जानेवारी(भगवान लोके)
: मुंबईतील केईएम – हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल या रुग्णालयात दाखल होणाऱ्या मुंबई बाहेरील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची राहण्याची गैरसोय होत असल्याचे आपल्या निदर्शनास आले आहे. याबाबत आपण स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी तोंडी सूचना दिल्या होत्या. परंतु अद्यापपर्यंत त्या गोष्टीकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. त्यामुळे याप्रकरणी मुंबईकरांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ जानेवारी रोजी केईएम हॉस्पिटलच्या आवारात कार्यकर्त्यांसोबत लाक्षणिक उपोषण करणार आहे, असे निवेदन भाजप नेते माजी आमदार प्रमोद जठार यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्तांना दिले आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, माजी आमदार या नात्याने रुग्णसेवेनिमित्त मुंबईतील केईएम हॉस्पिटल व टाटा हॉस्पिटल येथे आपण वारंवार जात असतो. त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक कोकण व महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. पण, त्यांना राहण्याची सोय नसल्याने ते पडपथावर झोपतात. त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोविड सारख्या आजारामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक व्हायरल इन्फेक्शन होवून आजार पसरवू शकतात. यावर आपण मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातून संबधित हॉस्पिटलच्या आजूबाजूला रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी प्रशासनामार्फत तरतूद करावी. किंवा केईएम हॉस्पिटलच्या आवारात इमारत बांधावी . तशी तरतूद २०२४ – २५ या अर्थ संकल्पात करावी. या गोष्टीकडे मुंबईकरांचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी २६ रोजी आपण उपोषणास बसणार असल्याचे प्रमोद जठार यांनी निवेदनात म्हटले आहे.