कणकवलीत २७ ते २८ जानेवारीला सम्यक साहित्य कला संगिती

0

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी यांच्यावतीने आयोजन

कणकवली दि.२१ जानेवारी(भगवान लोके)

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी यांच्यावतीने २७ ते २८ जानेवारी या कालावधीत येथील मराठा मंडळाच्या नाट्यगृहात दुसरी सम्यक साहित्य कला संगिती आयोजित करण्यात आली आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार असून या संगितीचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मोहनदास नैमिशराय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तर स्वागताध्यक्षपदी डॉ. रवींद्र जाधव हे आहेत, अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा. राजेंद्र मुंबरकर यांनी दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कार्याध्यक्ष इंजि. अनिल जाधव, सरचिटणीस राजेश कदम, कोषाध्यक्ष जनीकुमार, तालुकाध्यक्ष सिद्धार्थ तांबे, किशोर कदम उपस्थित होते.

शनिवारी सकाळी १० वा. सम्यक साहित्य कला संगितीचे उद्घाटन होईल. यावेळी ज. वि. पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड, डॉ. श्रीधर पवार, प्रा. आनंद देवडेकर, सुनील हेतकर, दीपक पवार, प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर, प्रा. आशातला कांबळे, सुधीर जाधव, प्रा. विजय मोहिते, भावेश लोखंडे, प्रा. डॉ. संजय खैर, संजय गमरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटनानंतर विनायक मिठबावकर यांचा ज. वि. पवार यांच्या हस्ते सन्मान केला जाईल. अपरान्त संगिती विशेषांक व इतर पुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होईल. त्यानंतर उर्मिला पवार, मोहनदास नैमिशराय यांच्यासह मान्यवरांचे मनोगत होईल.

दुपारी २ ते सायं. ४ या वेळेत ‘मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते’ या विषयावर आर्या कदम हिची एकपात्री नाटिका सादर होईल. गांधी-आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित प्रेमानंद गब्जी यांनी लिहिलेली व अरुण कदम दिग्दर्शित राजदत्त तांबे व रमेश कांबळे यांची नाटिका सादर होईल. प्रा. सिद्धार्थ तांबे लिखित ‘जाता नाही जात’ या पुस्तकाचे अभिवाचन बुद्धदास कदम, सुधीर कदम, सुरेश जाधव हे करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वगत मिलिंद कांबळे सादर करतील, संभाजी महाडिक लिखित ‘महापुरुष’ व सदा सावधकर लिखित ‘सबका मंगल होय रे’ यावर अशोक चाके कलाविष्कार सादर करतील.

सायंकाळी ४ वा. ‘धम्मक्रांतीच्या परिप्रेक्ष्यातील वाटचाल’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद देवडेकर असून प्रा. कांता कांबळे, प्रा. विजय मोहिते, डॉ. सोमनाथ कदम, इंजि. अनिल कदम, जयवंत मोरे यांचा सहभाग असेल. सायं. ६ वा. काव्यसंमेलन होईल. यात जिल्ह्यातील कवी व कवयित्रींचा सहभाग असेल. रात्री ९ वा. शाहीर संमेलन होईल. यात जिल्ह्यातील शाहिरांचा सहभाग असेल.

रविवार २८ जानेवारीला सकाळी १० वा. ‘जलसा टू रॅप’ हा कार्यक्रम होईल. यात राष्ट्रपाल सावंत, यश धम्मपाल सपकाळ यांचा कलाविष्कार सादर होईल. त्यानंतर ‘एमसी वृक्ष’ यावर रिशा लखन, ‘एमसी धामक’ यावर यश पवार, वॉक्स -विदित घाडगे यावर खबरदार ग्रुप कलाविष्कार सादर करतील. ११ वा. कथांचे वाचन व अभिवाचन होईल. यात कल्पना मलये, रमाकांत जाधव, सुनील हेतकर, नीलेश पवार, भावेश लोखंडे, प्रा. संतोष वालावलकर यांचा सहभाग असेल. १२ वा. सिनेअभिनेते अरुण कदम, बुद्धदास कदम, संदेश जाधव यांची अशोक चाफे हे मुलाखत घेतील. दुपारी २ वा. ‘साहित्याचे सौंदर्यशास्त्र’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी प्रा. आशालाता कांबळे असून प्रा. प्रवीण बांदेकर, अरुण कदम, प्रा. शिवराज गोपाले, प्रा. सिद्धार्थ गो. तांबे, डॉ. बी. एल. राठोड यांचा सहभाग असेल. ४ वा. ज. वि. पवार यांची डॉ. श्रीधर पवार, संदेश पवार मुलाखत घेतील. सायं. ५ वा. या संमेलनाचा समारोप ज. वि. पवार, उर्मिला पवार, रमाकांतजाधव, संदेश पवार, डॉ. राजेंद्र मुंबरकर यांच्या उपस्थितीत होईल.

या संगितीनिमित्त साहित्य विषयक चित्र व पुस्तक प्रदर्शन भरविले जाणार आहे. सम्यक साहित्य कला संगितीला साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीने केले आहे.