गुळदुवे वाचनालयात साहित्य जागर आजगाव साहित्य कट्ट्याचा उपक्रम

सावंतवाडी दि.२२ जानेवारी 
आजगाव येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा एकोणचाळीसावा मासिक कार्यक्रम गुळदुवे येथील ज्ञानदीप वाचनालयात नुकताच पार पडला. कथा, कविता, अभिवाचन यांनी रंगलेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. गुळदुवे गावातील लहान-थोर रसिक यासाठी मुद्दाम उपस्थित होते. विशेष म्हणजे मुंबईतील काही साहित्यप्रेमीही या कार्यक्रमासाठी आले होते.
सुरुवातीला कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर स्नेहा नारींगणेकर यांनी साहित्य कट्ट्यावरील एक कविता सादर केली. त्यानंतर संकेत येरागी यांनी ‘मनातील सल’ ही स्वरचित कविता सादर केली. सोमा गावडे यांनी एका वाङ्मयीन उताऱ्याचे वाचन केले, तर सरोज रेडकर यांनी वि. स. खांडेकर यांची एक कथा सांगितली. कवी विनय सौदागर यांनी ‘वारी अनुभवावी’ ही मराठी,तर ‘खालंव काय आणि खातंव काय’ ही मालवणी कविता सादर केली. साहित्य संगम, गोवाचे कार्यवाह गजानन मांद्रेकर यांनी शुद्ध मराठी भाषा बोलण्याविषयी मार्गदर्शन केले.
मूळ आरोंदा येथील परंतु आता मुंबईला स्थायिक झालेले दिगंबर जोशी हे बिपीनचंद्र नरवणे, अरविंद आत्मसिद्ध, प्रकाश माने आणि पी.आर. देशपांडे या आपल्या मित्रासमवेत या कार्यक्रमासाठी मुद्दाम उपस्थित होते. जोशी यांनी ‘ वेड्यांच्या कथा’ आणि ‘सुरंगी-बकुळी’ या दोन कथांचे आपल्या खड्या व सुस्पष्ट आवाजात सादरीकरण केले. या कथा रसिकांना खूप आवडल्या. जोशी यांनी आजगावच्या ‘आंबिये सर वाचन कट्ट्या’साठी काही पुस्तके भेट म्हणून दिली.
या कार्यक्रमात आजगाव येथे विविध शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या विनय सौदागर यांचा ज्ञानदीप वाचनालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नेटके आयोजन करणारे वाचनालयाचे कार्यवाह अरुण धर्णे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास साहित्य संगम गोव्याचे अध्यक्ष सुभाषजी शेटगावकर, तसेच राजन खोबरेकर, संतोष राऊत,अविनाश जोशी, नंदकिशोर धर्णे, सरिता शेटकर, अनिता सौदागर, गीता धर्णे, रुपेश धर्णे, पूर्वा कारेकर, चिन्मय सावंत, आराध्या शेटकर, ज्योती पेंडसे, रमेश गावडे, एकनाथ शेटकर, संतोष सावंत, फटू धर्णे आणि लेखक बाळकृष्ण राणे उपस्थित होते.