जय श्री राम , प्रभु रामचंद्र की जय हो चा श्रीराम भक्तांनी केला जयघोष ; रामभक्तांनी काढलेल्या मिरवणूकीला मोठा प्रतिसाद
कणकवली दि. २२ जानेवारी (भगवान लोके)
अयोध्यानगरीत श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना सोहळ्या निमित्ताने नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांच्या वतीने श्रीराम यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नांदगांव येथील राममंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली . तसेच श्रीराम प्रतिष्ठापणेचे थेट प्रक्षेपण रामभक्तांना दाखविण्यात आले. या मिरवणुकीत राम मुर्ती असलेला सजवलेला रथ , भगव्या टोप्या , भगवे कुर्ते , भगवे झेंड्यांमुळे सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जय श्री राम , प्रभु रामचंद्र की जय चा श्रीराम भक्तांनी केला जयघोष करत भव्य मिरवणूक काढण्यात आली.
श्रीराम मंदिर उद्घाटन व श्रीरामाच्या मुर्ति प्राणप्रतिष्ठापना होण्यापुर्वी नांदगांव तिठा येथे श्रीरामाच्या भव्य मिरवणूकीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. या मिरवणूकीत ५०० हून अधिक मोटारसायकल स्वार , रिक्षा , कार , मालवाहतूक वाहने भरुन रामभक्तांनी सहभाग घेतला. जय श्रीरामचा जयघोष करत ही मिरवणूक नांदगांव तिठा ते नांदगाव मोरये वाडी येथील श्रीराम मंदिरात महाआरती करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मिरवणूक पुढे जात नांदगांव गोसावी वाडी – कुंभार वाडी येथील श्रीराम मंदिरात आ. नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करुन रामनामाचा जयघोष करण्यात आला.
त्यानंतर भव्य मिरवणूक नांदगाव येथील ब्रिज खाली गेल्यानंतर LED TV स्क्रीन वर रामभक्तांना अयोध्या येथील श्रीराम प्रतिष्ठापणासोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. यावेळी रामभक्तांनी मनोभावे श्रीरामाची महाआरती करत जोरदार घोषणाबाजी केली . यावेळी श्रीराम प्रतिष्ठापणा होताच जोरदार फटाक्यांची आतिषबाजी व घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा मिरवणूक तोंडवली येथील श्री हनुमान मंदिर पर्यंत नेण्यात आली. त्याठिकाणी रामभक्तांनी महाआरती करत समारोप केला . त्यानंतर सर्व रामभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले .
सुमारे 500 वर्षानंतर हा आलेला दिवस सुवर्ण योग असल्याने नांदगाव दशक्रोशीतील श्री राम भक्तांनी ग्रामदेवता मंदिर , गणेश मंदिर , दत्त मंदिर व विविध मंदिरांमध्ये आरती , नाम जप व धार्मिक कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात नांदगाव, असलदे, कोळोशी, आयनल,तोंडवली – बावशी ,ओटव , बेळणे, सावडाव, माईण आदी दशक्रोशीतील सर्व श्री रामभक्तांनी सहभाग घेतला.