उपोषणाच्या पूर्वतयारीसाठी गावांमध्ये आयोजित केलेल्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी,दि.२२ जानेवारी
कलंबिस्त आणि माडखोल पंचक्रोशीतील ९ गावातील शेतकरी शासनाच्या काजू पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहिले. त्यामुळे शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटनेने २६ जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला असून या उपोषणाच्या पूर्वतयारीसाठी रविवारी या गावांमध्ये आयोजित केलेल्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जोपर्यंत नुकसान भरपाई बाबत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार या बैठकामध्ये करण्यात आला.
यावेळी शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटनेचे जिल्हाध्यक्ष वसंत केसरकर, माडखोल माजी सरपंच संजय राऊळ, कलंबिस्त माजी सरपंच बाळू सावंत, सामाजिक कार्यकर्ते अशोक सावंत, कांता सावंत, उदय सावंत, शाहू पास्ते, सगुण पास्ते, हनुमंत पास्ते, शिरशिंगे सरपंच दीपक राऊळ, माजी सरपंच सुरेश शिर्के, नारायण राऊळ, गणपत राणे, चंद्रकांत राऊळ, पोलीस पाटील गजानन राऊळ, ज्ञानदेव राऊळ, पांडुरंग राऊळ, विकास राणे, वेर्ले माजी सरपंच सुभाष राऊळ, रुचिता राऊळ, सोसायटी चेअरमन विजय राऊळ, मधु पायरेकर, दिलीप राऊळ, विठ्ठल राऊळ, अनिल लिंगवत आदी उपस्थित होते.
शासनाच्या २०२२-२३ वर्षातील काजू पीक विमा योजनेच्या नुकसान भरपाईचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळाला. मात्र ओवळीये, वेर्ले पारपोली, माडखोल, निरुखे, भोम, कारीवडे या ९ गावातील शेतकरी या नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. सावंतवाडी व आंबोली महसूल मंडळामध्ये समन्वय नसल्यामुळेच सर्व शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतिक्षेत आहे.
त्यात माडखोल येथे स्वयंचलित हवामान केंद्र मंजूर आहे. परंतु ते कार्यान्वित नाही. त्यानंतर प्रांताधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत ही प्रलंबित नुकसान भरपाई देण्याचा निर्णय झाला परंतु अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी याची तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषण छेडण्याचा इशारा शेतकरी कामगार संरक्षण विकास संघटनेने दिला आहे.