देवगड,दि.२२ जानेवारी
अयोध्येमध्ये श्री रामलल्ला विराजमान होत होते. तिकडे अयोध्यानगरी सजली होती. देशभरात रामनामाचा गजर होत होता. अगदी तसाच रामनामाचा गजर विजयदुर्ग- जुनी बाजारपेठ येथील राम मंदिरात चालला होता. याच मुहुर्तावर किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीच्या सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला. आणि त्याची मुहुर्तमेढही रोवली. किल्ले विजयदुर्गच्या दक्षिणेकडील दर्या बुरूज आणि गणेश बुरूज हे समुद्राच्या लाटांनी आतून पोखरले गेले आहेत. त्यातील दर्या बुरूजाचे निखळलेले चिरे परत भरण्याची मोहीम फत्ते केली. हा छोटासा खारीचा वाटा असला तरी पुरातत्त्व खात्याचं विजयदुर्ग किल्ल्यातील कोसळलेल्या बुरूजांकडे लक्ष वेधण्याचा हा एक भाग होता. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनित झालेला आणि आंग्रे घराण्याच्या आरमारी साम्राज्याचे मुख्य ठाणे असलेला किल्ले विजयदुर्ग म्हणजे तब्बल 105 वर्षे मराठ्यांची अनभिषिक्त राजसत्ता असलेला हा अभेद्य किल्ला. जो कोणालाही कधीच सर करता आला नाही. शिलाहार राजा भोजच्या काळात बांधल्या गेलेल्या या किल्ल्याला शिवछत्रपतींनी दुहेरी तटबंदी करून तो अधिक अभेद्य केला. इ.स. 2005 साली या किल्ल्याचा अष्टशताब्दी महोत्सवही मोठ्या दिमाखात साजरा झाला. पुढे महोत्सव समितीचे रूपांतर प्रेरणोत्सव समितीत होऊन या समितीने अनेक उपक्रम आपल्या हाती घेतले. यातीलच एक उपक्रम श्री रामलल्लाच्या पुनर्प्रतिष्ठापनेच्या शुभ मुहुर्तावर घेतला गेला. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाशी सकारात्मक भूमिका ठेऊन दर्या बुरूजाचे निखळलेले चिरे पुनर्स्थापित करण्याचा हा उपक्रम समितीच्या सदस्यांनी पार पाडला. अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त आणि ओहोटीची वेळ ही अत्यंत साधून आली. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या बलभीम मारूती मंदिराजवळ समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर आणि सर्व सदस्यांनी श्रीफळ ठेऊन पारंपारिक गाराणे घातले. आणि ढोल ताशांच्या गजरात दर्या बुरूजाकडे एकत्रित येऊन मोहीमेकडे कूच केली. तशी ही मोहीम सोपी नव्हती. पण श्रीरामासाठी सेतू बांधणारे मारूतीरायाचे आशीर्वाद आणि शिवछत्रपतींची प्रेरणा सर्वांच्याच अंगी दाटली होती. पारई , मोठे दोरखंड, लाकडी ओंडके इतकीच काय ती मोजकी सामग्री ! जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय अशी ललकारी देत सर्व बळ एकवटून दर्या बुरूजाचा निखळलेला चिरा पुनर्स्थापित होऊ लागला. आणि समितीसह ग्रामस्थांनी केलेला मनोदय पूर्णत्वास गेला. ही मोहीम करताना समितीने पुरातत्त्व खात्याचे कोणतेही नियम यांना यत्किंचितही तडा जाऊ न देता सकारात्मक दृष्टीने कार्य केले. या मोहीमेमुळे विजयदुर्गवासीयांच्यात एक वेगळी प्रेरणा आणि चैतन्य निर्माण झाले आहे. या मोहीमेत किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष प्रसाद देवधर, सचिव बाळा कदम, संचालक गणेश मिठबावकर, संजय सावंत तसेच दिनेश जावकर, पंकज पुजारे, विजय तांबे, विजय जावकर, सुर्यकांत तिर्लोटकर, विकास जावकर, मिलिंद डोंगरे, अमित उर्फ पिंट्या डोंगरे, कुणाल जावकर, शशी जावकर, विशाल पुजारे, प्रदीप डोंगरे, प्रमोद डोंगरे, संकेत तिर्लोटकर, गणेश पुजारे यांसह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले होते.